पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शंतनु जाधवला ताब्यात घेण्यात आलं आहे. शंतनूने विद्यार्थिनीवर हल्ला केला, त्यावेळी अभ्यासिकेत जाणाऱ्या तरुणाने प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला. या घटनेनंतर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात
किरण माने यांनी पोस्टमध्ये विद्यार्थिनीचा जीव वाचवणारे लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांचं कौतुक केलं आहे. “संपूर्ण आयुष्यभर लपून-छपून मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत भेकडांसारखं जगणाऱ्यांपेक्षा, एक दिवस का होईना पण लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांच्यासारखे खरे मर्द व्हा! लेशपाल, हर्षद तुम्ही रियल लाइफ हिरो आहात, सलाम भावांनो,” असं किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, भर दिवसा पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या दर्शना पवार हत्याकांडानंतर आता पुन्हा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. त्यामुळे या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.