अनेक चित्रपट असे आहेत, त्यांची लोकप्रियता कायम टिकून राहते. अशा चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, कथानक आणि डायलॉग यामुळे चित्रपटाला मोठी लोकप्रियता लाभली. आजही ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाची चर्चा होते. आता सचिन पिळगांवकरांनी चित्रपटाची निर्मिती करतानाचे किस्से एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच ‘जस्ट नील थिंग्ज’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट बनवतानाचे कोणते किस्से सांगू शकाल का? असे विचारले. यावर बोलताना त्यांनी म्हटले, “लोकांना असं वाटतं की, चित्रपटातील काही डायलॉग हे आधीपासून स्क्रिप्टमध्ये नव्हते, ते चित्रपटाचे शूटिंग करताना सुचले आणि त्या त्या वेळी ते घेतले गेले आहेत. पण तसं नाहीये.”

काय म्हणाले सचिन पिळगांवकर?

पुढे बोलताना ते म्हणतात, “माझी स्क्रिप्ट लिहिण्याची पद्धत अशी आहे की, मी लेखकाबरोबर बसतो. तो लिहून देईल तसा मी चित्रपट शूट करत नाही. करूच शकत नाही. त्याच्याबरोबर बसून, मग तो सीन असा आहे, तो सीन असा करूयात. त्याच्यामध्ये काय होतं की, ५० ते ६० टक्के डायलॉग आधीच ठरलेले असतात, ठरून जातात.

उदाहरणार्थ, आम्ही हॉटेलच्या रुममध्ये बसलेलो होतो आणि माझ्या डोक्यात एक सीन आला. तो घरमालक आलेला आहे आणि आम्ही चौघेजण आहोत घरात. त्यातले दोन तिथे बसलेले आहेत. तिथे चार कप चहाचे आहेत आणि तो मालक येतो तो दरवाजा उघडतो. त्याच्यामागे जर आपण लक्ष्मीकांत बेर्डेला लपवलं. आणि तो सीन असा लिहिला होता की, लक्ष्मीकांत निघून जातो आणि घरमालकाला कळतच नाही. मग म्हटलं की त्याचा उपयोग काय आहे? आपण असं केलं तर तो लपलेला आहे, तो बाहेर निघतो, बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत घरमालक मागे पाहतो. मागे पाहिल्यानंतर आता काय? मग लक्ष्मीकांत दारावर वाजवतो आणि म्हणतो, धनंजय माने इथेच राहतात का?”

पुढे ते म्हणतात, “लेखक वसंत सबनीस मला म्हणाले, “मला कळलं नाही तुम्ही नक्की काय केलं ते.” त्यावर मी त्यांना ते सगळं करून दाखवलं. त्यांनी माझ्याकडे बघितंल आणि प्रश्न विचारला, “यावर लोक हसतील? मी त्यांना म्हटलं, “सबनीस साहेब, तुम्ही ते माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त एक डायलॉग लिहा, धनंजय माने इथेच राहतात का?” अशा अनेक गोष्टी स्क्रीप्ट लिहिताना झाल्या. त्या कशा प्रत्यक्षात आणायच्या हे मला स्पष्ट माहित होतं.

हेही वाचा: Video : “साडी नेसणारी पोरगी पाहिजे”, ‘बिग बॉस’ने मैत्रिणीबद्दल विचारताच सूरज चव्हाण लाजला! अभिजीत म्हणाला, “अरे…”

आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे, अशोक सराफच्या डोक्यात कल्पना येते की आपण पुरुषांना बाई बनवायचे. ती कल्पना इतर कोणत्याही व्यक्तीला बघून येत नाही. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या तिथे त्याला हे सुचतं. कारण तिथे बालगंधर्वांचे खूप मोठे पोट्रेट आहेत. एका बाजूला स्त्री रुपात आहेत आणि एका बाजूला पुरुष रुपात आहेत. तो त्या पोट्रेटकडे बघतो आणि माझ्याकडे बघतो आणि त्याच्या डोक्यात येतं की याला बाई बनवलं तर. कोणत्याही डायलॉगशिवाय ती कल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि त्यांनी त्याचा आनंद घेतला.” अशी आठवण सचिन पिळगांवकरांनी सांगितली आहे.

दरम्यान, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० सप्टेंबर २०२४ला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar shares story behind dhananjay mane ithech rahtat ka popular dialouge of ashi hi banwa banwi movie nsp