आत्मविश्वास आणि चैतन्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे तरुणाई. आजची तरुणाई काहीतरी नवं करण्यात गुंतलेली असते. देशाच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या दोन इंजिनिअर तरुणांची कथा सांगणाऱ्या कार्निवल मोशन पिक्चर्स’चा ‘मेरे देश की धरती’…. देश बदल रहा है’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
हा चित्रपट ६ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. देशासाठी विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन इंजिनिअर्स तरुण गावचा कसा कायापालट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.
आणखी वाचा : The Kashmir Files चित्रपटावर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शेती हा आपल्या देशाचा कणा राहिला आहे. दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी ची कसे शेतकरी बनतात, अशी रंजक कथा ‘मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहेत.
‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ‘मेरे देश की धरती’ ही कलाकृती प्रबोधनासोबत देशातील तरुणाईला क्रांतिकारी विचारांकडे नेणारी आहे असा विश्वास कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर व्यक्त करतात. तर चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत भासी यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे.