“मत मांडणे हा प्रत्येकाचा…” बॉयकॉट ट्रेंडवरील पंकज त्रिपाठी यांचे वक्तव्य चर्चेत

बॉलिवूडमधील ‘बॉयकॉट ट्रेंड’वर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली.

“मत मांडणे हा प्रत्येकाचा…” बॉयकॉट ट्रेंडवरील पंकज त्रिपाठी यांचे वक्तव्य चर्चेत
बॉलिवूडमधील 'बॉयकॉट ट्रेंड'वर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली

बॉलिवूडमधला बॉयकॉट ट्रेंड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांवर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांनी बहिष्कार टाकला. तसा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाला. त्यामुळे या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असुन, निर्मात्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच आता शाहरुख खानच्या आगामी चित्रपटासाठी देखील ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. या ‘बॉयकॉट ट्रेंड’वर आता बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक आपले मत मांडताना दिसत आहेत.

प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ‘बॉयकॉट ट्रेंड’वर भाष्य केले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले, “आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.”

आणखी वाचा – ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

चित्रपट आणि समाज कल्याण या दोन गोष्टींमधील परस्परसंबंधावर पंकज त्रिपाठी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये सर्वांना त्यांची मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी चित्रपट हे सरकारला महसूल मिळवून देणारे एक मोठे माध्यम आहे. हा महसूल नंतर समाजातील विकासकामांसाठी वापरला जातो. पण कोणत्या गोष्टीशी सहमत व्हायचं, कोणत्या चित्रपटाला समर्थन किंवा विरोध दर्शवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे.”

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाला, तरी अजुनही हा ट्रेंड सुरूच आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ १० कोटींची कमाई केली. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला.

आणखी वाचा – आमिरच्या सिनेमाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल

या चित्रपटात आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत असणाऱ्या करीना कपूर खानने देखील ‘बॉयकॉट ट्रेंड’वर प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत करीना म्हणाली, “कृपया या चित्रपटाला बॉयकॉट करू नका. हा खूप चांगला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांनी आमिर आणि मला स्क्रीनवर बघाव अशी माझी इच्छा आहे. आम्ही ३ वर्षं हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होतो. हे एका चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखंच आहे. जवळपास अडीच वर्षं २५० लोकांनी या चित्रपटासाठी काम केलं आहे.” करीनाने चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी विनंती प्रेक्षकांना केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल
फोटो गॅलरी