सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार वेळोवेळी व्यक्त होत असतात. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण ते शेअर करताना दिसतात. अनेकदा चाहते या कलाकारांचे कौतुक करतात. कधी मिश्कील टिप्पणी करतात तर कधी ट्रोल करतात. कलाकारही आक्षेपार्ह कमेंट्सवर संताप व्यक्त करताना दिसतात; तर काही कलाकार मिश्कीलपणे कमेंटवर प्रतिक्रिया देताना दिसतात.
आता अभिनेते अभिजीत चव्हाण(Abhijeet Chavan) यांनी त्यांच्या एका व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्सना मजेशीर उत्तरे दिली आहेत. अभिजीत चव्हाण हे त्यांच्या विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखले जातात. नाटक, सिनेमा तसेच मालिका या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिजीत चव्हाण हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. चाहते त्यांना ‘बाबा’ या नावानेही ओळखतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक खास क्षण ते चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. व्हिडीओ, फोटो या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
अभिजीत चव्हाण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते शेतीची मशागत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जमिनीवर ते एक मशीन फिरवताना दिसत आहेत. ते त्यांच्या गावी गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या पाठीमागे ‘माळ्याच्या मळ्यामंदी’ हे गाणं ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी मशागत अशी कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केला आहे. आता अभिजीत चव्हाण यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अभिजीत चव्हाण यांनीदेखील त्यांच्या कमेंट्सना मजेशीर रिप्लाय दिले आहेत.
अभिजीत चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर काय म्हणाले नेटकरी?
अभिजीत चव्हाण यांच्या व्हिडीओवर कमेंट करीत एका नेटकऱ्याने म्हटले, “चप्पल तरी काढ बाबा. काय तू, अशी कोण शेती करते का?” यावर अभिजीत चव्हाण यांनी, “मी करतो”, असे उत्तर दिले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “बाबा मशीन फिरवतो की मशीन बाबाला फिरवते”, असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहे. यावर अभिजीत चव्हाण यांनी आम्ही लॉंग ड्राइव्हला जातो, असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने म्हटले, “साहेब हे सगळं तुम्ही केलंय असं वाटत नाही. नुसतं शूटिंग काढताय ना?” यावर अभिनेत्याने “कसं पकडलंत” असं लिहिलं आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मेल्या, चप्पल तरी काढ”, त्यावर अभिजीत चव्हाण यांनी “तीच तर दाखवायची आहे”, असा प्रतिसाद देत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
याशिवाय त्यांच्या व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. “प्रश्न पडलाय, नेमकं कोण कोणाला फ़िरवतंय”, “बाबा शेतात खेळतोय”, “दादा भारी वाटलं, प्रत्येक कमेंटला तुम्ही सकारात्मक रिप्लाय दिला”, असे म्हणत कौतुक केले आहे.
दरम्यान, अभिजीत चव्हाण सध्या ‘मुरांबा’ मालिकेत काम करताना दिसत आहे. त्यांनी मालिकेत शशिकांत मुकादम ही भूमिका साकारली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd