“तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा”; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले

Chandrakant Patil criticizes Supriya Sule over OBC reservation

महानगरपालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी ग्वाही सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मंगळवारी दिली. मात्र मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाने आक्रमक होत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

“इम्पेरिकल डेटा गोळा करणे आणि सादर करणे या सरकारच्या बापालाही जमणार नाही. जर ते जमले आणि न्यायालयात सादर केले तर न्यायालय म्हणेल की हा डेटा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी पुढच्या निवडणुकीत वापरा. या निवडणुकीमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे भाजपाने निर्णय केला आहे की आम्ही ओबीसी समाजातील उमेदवारांना जागा देणार आणि या सरकारला घरची वाट दाखवणार”

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा मंत्रालयावर धडक मोर्चा; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे आम्हाला सांगितले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवारांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार नाही – चंद्रकांत पाटील

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याकरता भाजपाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार प्रितम मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाज, गोपीचंद पडळकर आणि अन्य नेते उपस्थित होते. भाजपाच्या मुख्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन संपले असल्याची घोषणा केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrakant patil criticizes supriya sule over obc reservation abn

Next Story
ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा मंत्रालयावर धडक मोर्चा; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी