मुंबई: राज्याच्या अनेक भागांत अजूनही पाऊस झालेला नाही. राज्यावर दुबार पेरणीचे संकट असले तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. चहापानानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी कमी पावसामुळे राज्यातील पेरण्याची स्थिती चिंताजनक असल्याचे मान्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पाऊस आणि पीकपाणीचा आढावा घेण्यात आला. या आठवडय़ात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून चांगला पाऊस होण्याची अपेक्षा असल्याचे शिंदे आणि पवार यांनी सांगितले. पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या तर त्याची व्यवस्था करण्यात येत असून हे सरकार कोणत्याही संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हा सरकाचा शब्द असल्याचे सांगत शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्ष आहे कुठे?

सरकारच्या पाठीशी २१० पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असून विरोधी पक्ष आत्मविश्वास गमावलेला आणि गोंधळलेला दिसत आहे. हे त्यांनी सरकारला दिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. विरोधकांकडे कोणताच विषय नसल्याने त्यांनी राज्यातील सर्वच विषयांची जंत्री या पत्रातून पाठविली आहे.  विरोधी पक्ष कितीही कमकुवत असला तरी सभागृहात त्यांना दुय्यम स्थान न देता  सभागृहात उपस्थित केलेल्या जनतेच्या सर्व प्रश्नाला सरकार न्याय देईल. सरकार चुकले तर त्याला जाब विचारायला विरोधी पक्ष आहे कुठे हे शोधावे लागेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

गुंतवणुकीत आघाडी

परदेशी गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर असून वर्षभरापूर्वी डावोस परिषदेत १.३६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. त्यापैकी ८६ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या करारांची अंमलबजावणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. विदर्भातील वस्त्रोद्योग केंद्र हे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता असताना केलेल्या मागणीमुळे मिळाले. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प किंवा उद्योगांबाबत केंद्राकडे  मागणीही केली नाही अशी टीका शिंदे यांनी केली.  वर्षभरात राज्यात २.३८ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे.कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांत झालेली परदेशी गुंतवणूक एकित्रत केली तरी त्यापेक्षा राज्यातील गुंतवणूक अधिक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शिक्षणात दुसरा क्रमांक

शिक्षणात राज्याचा सातवा नव्हे तर पंजाबच्या नंतर दुसरा क्रमांक आहे, असा दावाही त्यांनी केला. तर विधिमंडळात बहुमताच्या जोरावर कोणतेही काम रेटले जाणार नाही. विरोधकांशी आपुलकीच्या भावनेतून वागून लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde assured farmers help in crisis of double sowing zws