मुंबई : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबईत येत आहेत. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदार यांना मूर्मू यांच्याबरोबर होणाऱ्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना मंगळवारी पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते त्यांच्यासमवेत असतील. भाजप, शिंदे गट व अपक्ष आमदार- खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील पंचतारांकित लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या वेळी मुर्मू या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप व शिंदे गटातील नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.

 खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना किंवा शिवसेनेच्या आमदार- खासदारांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. शिंदे गटाला आमंत्रित करण्यात आले असून एनडीएच्या बैठकीत प्रवक्ते दीपक केसरकर हे सहभागी झाले आहेत. ठाकरे गटाला आमंत्रित करण्यात येणार नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तर बुधवारी सकाळपर्यंत तरी आमंत्रण आले नसल्याचे व त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच नसल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल आनंदच -देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा दिल्याबद्दल आनंदच असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी वगळता अन्य काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. राज्यातून त्यांना चांगली मते मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draupadi murmu mumbai uddhav thackeray not invited despite support ysh