मुंबई : थायरॉईडच्या ग्रंथींमुळे घशाला सूज आल्याने खाण्या-पिण्यास त्रास होणार्‍या ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एमव्हीए) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर थाॅयराईडवरील उपचारासाठी करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत महिलेला खाण्यास, बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. वांद्रे येथील मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागात काही दिवसांपूर्वी घशाच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेली ३२ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ही महिला उपचारासाठी आली होती. या महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना सूज असल्याचे आढळले.

हेही वाचा : “इतिहासजमा”, डबल डेकर बसच्या अखेरच्या दिवशी सेलिब्रिटी भावुक; म्हणाले, “मुंबईकरांसाठी ही बस नाही तर…”

अशा प्रकारची सूज आल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया नाजूक व अवघड मानली जाते. या शस्त्रक्रियेला साधारणपणे २ तास लागतात. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवसांपर्यंत रुग्णालयात राहण्याबरोबरच चालणे, फिरणे, खाणे इत्यादींवर बंधने येतात. शस्त्रक्रियेमुळे गळ्यावर तयार होणारे व्रण आयुष्यभर राहतात‌. या बाबी लक्षात घेऊन डॉक्टरांनी एमव्हीए पद्धतीची सूक्ष्म शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : प्रभादेवी नाक्यावर स्वागत मंडपांना पोलिसांनी परवानगी नाकारली; गेल्यावर्षी ठाकरे आणि शिंदे गटांतील वादानंतर झाला होता गोळीबार

एमव्हीए तंत्रज्ञानामध्ये सोनोग्राफीच्या सहाय्याने व एक सूक्ष्म सुईद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या १० मिनिटांत झालेल्या या शस्त्रक्रियेअंतर्गत सुईद्वारे थायरॉईडमधील बाधीत पेशी नष्ट करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत गळ्यावर कोणताही छेद देण्याची गरज नसते. त्यामुळे या महिला रुग्णाला पूर्ण भूल न देता शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांनी या महिलेला बोलण्याची अनुमती देण्यात आली. तसेच चालण्याची, फिरण्याची व खाद्यपदार्थ खाण्याचीही परवानगी देण्यात आली.

हेही वाचा : प्लास्टिकच्या बाटल्या काढताना नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू

अवघ्या काही तासांनंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रियेचा कोणताही व्रण तिच्या शरीरावर नव्हता. एमव्हीए तंत्रज्ञान वापरून केलेल्या या शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच ही महिला दैनंदिन काम करू लागली, अशी माहिती भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी दिली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रेडिओलॉजी विभागातील डॉक्टर रितेश खोडके, परिचारिका लिना नाईक आणि शस्त्रक्रियागृहातील सहाय्यक किशोर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai thyroid surgery within 15 minutes on a woman at bhabha hospital by using microwave ablation mumbai print news css