मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या व क्रिकेटपटू कृणाल पंड्या या दोघांना सावत्र भाऊ वैभव पंड्याने छायाचित्र व चित्रफीत मॉर्फ करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्या पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी वैभव पंड्याचा मोबाइल, लॅपटॉप व आयपॅड जप्त केला आहे.

मॉर्फिंगच्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी त्यांचे सायबर न्यायवैद्यक परीक्षण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नुकतीच पंड्या बंधूंची ४.३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध

पंड्या बंधूंनी वैभवसोबत २०२१ मध्ये पॉलिमर व्यवसायासाठी कंपनी स्थापन केली होती. देशातील बड्या कंपनीसोबत ही कंपनी पॉलिमरचा व्यवसाय करीत होती. वैभव त्या कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहत होता. वैभवने करारातील अटींचा भंग केला आणि दोन्ही भावांना अंधारात ठेवून त्याच व्यवसायात स्वत:ची कंपनी स्थापन केली. त्यानंतर वैभवने या कंपनीतील रक्कम कथित स्वरूपात नव्याने स्थापन केलेल्या कंपनीत वळवली.