मुंबई : मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पगार पुढील महिन्यापासून वाढणार आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना ४२ टक्के वाढीव दराने महागाईभत्ता आणि २७ टक्के घरभाडे मिळणार आहे. या पगारवाढीची अंमलबजावणी सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून ४२ टक्के दराने वाढीव महागाईभत्ता लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महापालिका मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता लागू करण्याचा आणि २७ टक्के घरभाडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा खर्च मुंबई महानगरपालिकेने उचलला आहे. त्यासाठी राज्यसरकारकडून ५० टक्के रक्कम मिळते. मात्र चौथ्या वेतन आयोगापासूनच्या थकीत अनुदानाची रक्कम राज्य सरकारकडून अद्यापही महानगरपालिकेला मिळालेली नाही. वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के रक्कम मिळणे आवश्यक आहे. पण ती मिळाली नाही. राज्य सरकारकडून ५० टक्के रक्कम मिळेल या सापेक्ष सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाला विद्यार्थी संघटनांचा घेराव; फोर्ट संकुलाचे प्रवेशद्वार बंद

हेही वाचा : क्षयरोगावरील औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल, औषध खरेदीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला खार

सप्टेंबर महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी थकबाकीची रक्कम राज्य सरकारकडून मिळाल्यानंतरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सातव्या वेतन आयोगमुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर ६० ते ७० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai government granted private primary schools teachers salary increment mumbai print news css