मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समजण्यासाठी त्यांच्या निधनानंतर दहा वर्षे लागली, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने बाजार मांडू नका, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जाऊन ठाकरे व कुटुंबीयांनी आणि शेकडो शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाच्या विचारांचा वारसा शिंदेच पुढे घेऊन जात आहेत, असे त्यांनी व फडणवीस यांनी सांगितले होते. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा आजचा स्मृतीदिन मला वेगळा वाटतो. काही नेत्यांना शिवसेनाप्रमुखांचे विचार त्यांच्या निधनानंतर दहा वर्षांनी समजले. अनेकांना शिवसेनाप्रमुखांविषयी प्रेम आहे व त्यांनी भावना व्यक्त करायलाही हरकत नाही. विचार व्यक्त करताना तशी कृतीही केली पाहिजे. पण तसे करताना शिवसेनाप्रमुखांचा बाजार कोणीही मांडू नये. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली होती. याविषयी ठाकरे म्हणाले, भाजपला संपूर्ण देशाचा ताबा हवा आहे. तिथे स्मारकाचे काय? त्यांना सर्वच आपल्या नियंत्रणाखाली घ्यायचे आहे.

स्मारकात संघर्षचित्रे

स्मारकाविषयी माहिती देताना ठाकरे म्हणाले, बाळासाहेब  ठाकरे हे केवळ शिवसेना प्रमुख नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. त्याचा जिवंत अनुभव त्यांच्या स्मारकात पाहता येईल. शिवसेनाप्रमुख म्हटले की संघर्ष आलाच. या संघर्षांबद्दलची अर्क चित्रे स्मारकातील प्रदर्शनात पहायला मिळतील.

आदित्य यांनाच गोमूत्राने स्नान करावे लागेल शिंदे गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. यामुळे शिंदे गटात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचेच शुद्धीकरण करण्याची गरज असून त्यांना गोमूत्राने स्नान करावे लागेल, असा टोला शिंदे गटाने लगावला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name of shiv sena chief balasaheb thackeray dont use name eknath shinde ysh