मुंबईः कांदिवली पूर्व येथे सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा उलगडा करण्यात समता नगर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी ३४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसंबंधाला अडसर ठरत असल्यामुळे आरोपीने मृत व्यक्तीला दारू पाजून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांदिवली पूर्व येथे दामू नगर परिसरात एका निर्जनस्थळी ३४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पण मृत व्यक्ती पडून त्याच्या डोक्याला मार लागेल अशी कोणतीही वस्तू घटनास्थळी उपस्थित नव्हती. त्यामुळे त्या व्यक्तीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मृतदेह योगेश कांबळे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत व स्थानिक खबऱ्यांच्या मार्फत माहिती घेतली असता मृत व्यक्ती आरोपी रविंद्र गिरी (३४) याच्यासोबत दारू प्यायला होता. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गिरीला ताब्यात घेतले असता त्यानेच कांबळेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – मुंबई : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटक, वडाळा व कुरार येथील घटना

हेही वाचा – मुंबई : गिरगावातील आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीवर प्रेम होते. त्यातून गिरीने त्याला मारण्याचा कट रचला. सुरुवातीला त्याला दारू पाजून त्याची शुद्ध हरपल्यानंतर तेथील खदान परिसरात नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हत्येत वापरलेला दगड आरोपीने त्याच्याकडील बॅगेत भरून तेथून घेऊन गेला. अशा पद्धतीने आरोपीने हत्या करून तो अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गिरीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person murder kandivali east the accused was arrested mumbai print news ssb