मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विरोधकांना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमधील धार्मिक हिंसाचाराच्या घटना ताज्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जिवे मारण्याची धमकी आल्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र राज्यातील शांतता बिघडवण्यामागे विरोधकच असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या हिंसाचाराबाबत बोलताना शिंदे यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तसेच हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पवारांच्या सुरक्षेचा आढावा

शरद पवार यांना समाजमाध्यमांवरून देण्यात आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत तपासाच्या सूचना दिल्या. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वानाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition conspiracy to disrupt law and order in maharashtra says cm eknath shinde zws