लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी तसेच आरामदायी आणि किफायतशीर निवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात हे पॉड हॉटेल पर्यटकांसाठी खुले होईल.

माथेरान हे मुंबईपासून रस्ते मार्गाने ११० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर आहे. त्यामुळे, मुंबई, पुणेकरांसाठी एक दिवसीय सहलीसाठी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून २० किमी अंतरावर माथेरान आहे. येथून मिनी ट्रेन किंवा बस, जीपद्वारे माथेरानला जाता येते. मात्र, माथेरानला भेट देणाऱ्यांत देशविदेशातील पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी एक ते दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे, पर्यटकांना राहण्यासाठी सर्वोत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : ६२ वर्षे जुन्या पुलाच्या तुळ्या बदलल्या

माथेरान येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. याठिकाणी राहण्यासाठी छोटी-मोठी हॉटेल उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यासाठी एकेरी, दुहेरी आणि कौटुंबिक पॉड्स उभारण्याचे काम सुरू आहे. या पॉड हॉटेलचे काम वेगात सुरू आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर, पर्यटकांना पॉडची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जगात सर्वप्रथम जपानमध्ये पॉड हॉटेलची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले. पुढे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात पॉड हॉटेलची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या पॉड हॉटेलमध्ये पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यात येते. पॉड हॉटेलला मिळणाऱ्या पसंतीमुळे मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील ऑनलाइन निविदा सप्टेंबर २०२३ रोजी काढली गेली. यशस्वी बोलीकर्त्याने ८,१९,००० रुपये वार्षिक रकमेसाठी करार केला. कराराची पहिली तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात १० टक्के वार्षिक वाढ करण्याच्या तरतुदीसह एकूण कराराचा कालावधी १० वर्षांचा आहे. ७५८.७७ चौमी क्षेत्रफळावर पॉड हॉटेल असणार आहे, असेही मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.