लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणा दरम्यान असणाऱ्या पुल क्रमांक ९० च्या ६२ वर्षे जुने स्टीलच्या तुळया बदलण्यात आल्या. हे काम करण्यासाठी साधारणपणे ८ तासांचा कालावधी लागतो. मात्र, पश्चिम रेल्वेने हे काम ६ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. स्टीलच्या तुळयाऐवजी पोर्टलँड स्लॅग सिमेंट (पीएससी) स्लॅब बदलण्यात आला.
आणखी वाचा-कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती
विरार – वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक ९० वर तुळई बदलण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेतला होता. शुक्रवारी रात्री १०.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत ब्लॉक होता. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल रद्द होत्या. तर, काही लोकल अंशत: रद्द केल्या. त्यानंतर, १९६२ साली उभारण्यात आलेल्या पुलाच्या तुळया बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. ब्लॉकच्या संपूर्ण कालावधीचा वापर करून पायाभूत सुविधा, देखभाल-दुरूस्तीचे काम केले गेले आहे. त्यामुळे प्रवाशांचा लोकल, रेल्वेगाड्यांचा प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.