शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला आहे. मात्र, या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या वादावर आता रवींद्र वायकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र वायकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. त्यांनी निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी मतांचं गणितही मांडलं. यावेळी बोलताना त्यांनी ईव्हीएम हॅक करण्याच्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “माझ्याकडे दोनच पर्याय होते, तुरुंग किंवा…”, शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकरांचा गौप्यस्फोट

नेमकं काय म्हणाले रवींद्र वायकर?

“फोनमुळे ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं. ते कुणी करुन दाखवलं तर बरं होईल. तसं झालं असतं तर भाजपाने ४०० जागा जिंकल्या असत्या. यासंदर्भात ठाकरे गटाला न्यायालयात जायचं असेल तर जाऊ शकतात. लोकशाहीत त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली.

मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? वायकर म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं बाबतही माहिती दिली. “निकालाच्या दिवशी मी सकाळापासून टीव्ही बघत होतो. त्यादिवशी सायंकाळी ५ वाजून ५१ मिनिटांनी ‘दोन हजारांपेक्षा जास्त मतांनी अमोल किर्तीकर विजयी झाले’, अशी बातमी आली. याबाबत मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सांयकाळी ६ च्या सुमारास मी मतमोजणी केंद्रावर पोहोचला. तेथील अधिकाऱ्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगतिलं की आम्ही अजून निकाल जाहीर केलेला नाही, मग ही बातमी कुठून आली? याचा अर्थ मतमोजणी केंद्रात इतर काही जणांजवळही मोबाईल होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच या मोबाईलमुळे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? हे जर कुणी सिद्ध करून दाखवलं, तर बरं होईल”, असेही ते म्हणाले.

वायकरांनी सांगितलं मतांचं गणित

यावेळी बोलताना त्यांनी मतांचे गणितही मांडलं. ते म्हणाले, “बॅलेट पेपरची मोजणी सकाळी ८ वाजता झाली. ती मोजणी संपल्यानंतर त्याची आकडेवारी समोर आली. तेव्हा मला १५५० मतं, तर अमोल किर्तीकरांना १५०१ मते मिळाली होती. ज्यावेळी ईव्हीएमची मतं मोजण्यात आली, तेव्हा शेवटच्या फेरीत ते एका मताने पुढे होते. जर मला ईव्हीएम हॅक करायची असती, तर मी एका मताने मागे का राहिलो असतो का? जेव्हा बॅलेट पेपर आणि ईव्हीएमची मते मोजण्यात आली, तेव्हा त्यांना बॅलेट पेपरमध्ये मिळालेल्या १५०१ मतांपैकी एक मत आणि ईव्हीएमच्या मोजणीतील एक मत असे वजा झाले. त्यामुळे ४८ मतांनी माझा विजय झाला”, असे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – “पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव…”, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार; म्हणाले, “मी महत्व…”

राज ठाकरेंच्या भेटीबाबत म्हणाले…

दरम्यान, त्यांनी राज ठाकरेंच्या भेटीबाबतही माहिती दिली. “मी आज राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. निवडणूक जिंकण्याच्या पूर्वीही मी त्यांना भेटलो होतो. या निडवणुकीत त्यांचे आशिर्वाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळालं, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मी आज त्यांची भेट घेतली”, असं रवींद्र वायकर म्हणाले.