मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे खाडी, वसई खाडी आणि उल्हास नदी एकमेकांना जोडून मुंबई, वसई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई अशी वर्तुळाकार जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आवश्यक त्या परवानग्या घेऊन प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.
सागरी मंडळने ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत वसई – ठाणे – कल्याण असा ५० किमी लांबीचा जलमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत १० जेट्टी बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चार जेट्टींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील इतर ठिकाणेही जलमार्गाने जोडण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे.
या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासाठी अर्थसंकल्पात ४२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. मार्गात अडथळा ठरणारा खडक फोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात येणार आहेत. यासाठी पर्यावरणासंबंधीची परवानगी अत्यंत महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या परवानग्या मिळाल्यानंतर खडकाचा प्रकार लक्षात घेऊन तो फोडण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे काम सुरू होण्यास एक वर्षांचा कालावधी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण झाल्यास ठाणे, वसई खाडी, तसेच उल्हास नदी एकमेकांशी जोडली जाईल आणि जलमार्गाचा मार्ग मोकळा होईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रवास अतिजलद
ठाणे मीठ बंदर आणि कशेळीदरम्यानचा खडक फोडून जलमार्गातील अडथळा दूर करण्यात येणार आहे. हा अडथळा दूर झाल्यानंतर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक ठिकाणे जलवाहतुकीने जोडून प्रवास अतिजलद करण्यात येणार आहे. भविष्यात दक्षिण मुंबई – कल्याण, ठाणे – वाशी, बेलापूर, ठाणे – कल्याण, डोंबिवली, ठाणे – वसई खाडी अशी जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.