करोनाची भयछाया विरळ होऊ लागल्याने सणासुदीचा आनंद दुणावला असून, चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. याच उत्सवी वातावरणात महाराष्ट्रातील अनोखा दानयज्ञ बुधवारी, गणेश चतुर्थीपासून सुरू होत आहे. हा दानयज्ञ आहे ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा. यंदा या उपक्रमाचे बारावे पर्व आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ओळख करून देण्यात येते. गेल्या ११ वर्षांत या उपक्रमांतर्गत ११२ संस्थांची ओळख करून देण्यात आली. त्यात कोणी वंचितांचा आधारवड बनलेली, कोणी साहित्य-संस्कृतीत अमूल्य योगदान देणारी, कोणी महाराष्ट्राचे बुद्धिवैभव जपणारी, कोणी शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत निरपेक्ष भावनेने काम करत पाय घट्ट रोवून उभी राहिलेली, तर कोणी अनाथ, जखमी प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी सरसावलेली संस्था. या सर्वच संस्था विविध क्षेत्रांतील उणिवा हेरून त्या दूर करण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. आर्थिक अडचणीचा सामना करूनही या संस्था आपले काम नेटाने करत आहेत.

विधायक कार्याचा वसा घेऊन काम करणाऱ्या या संस्थांना मदतीचे पाठबळ देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच. गेल्या ११ वर्षांत दानशूरांनी ते चोखपणे बजावले. त्यात ‘लोकसत्ता’ची भूमिका केवळ माध्यम म्हणूनच. या उपक्रमाद्वारे या संस्थांची विधायक साखळी ‘लोकसत्ता’ने तयार केली आहे.

दात्यांना आवाहन…
गेल्या ११ वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील ११२ संस्थांच्या सेवाव्रतींना बळ मिळाले. यंदाही गणेशोत्सवकाळात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दहा संस्थांची ओळख या उपक्रमाद्वारे करून देण्यात येणार आहे. या संस्थांच्याही कार्याला लाखो दानशूर पाठबळ देतील, याची खात्री आहे.

मदतनिधीसाठी ऑनलाइन सुविधा
यंदाही या उपक्रमातील संस्थांसाठी ऑनलाइन मदतनिधी जमा करण्याची सुविधा या उपक्रमाचे बॅंकिंग पार्टनर असलेल्या ‘कॉसमॉस’ बँकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील संबंधित संस्थेचा परिचय करून देणाऱ्या लेखात देण्यात येईल. देश-विदेशातील दानशूरांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada initiative of loksatta mumbai print news amy