महाविकास आघाडीला मोठा धक्का ; शिवसेना, काँग्रेसची मते फुटली; विधान परिषदेत भाजपचे पाचही उमेदवार विजयी

राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.  

महाविकास आघाडीला मोठा धक्का ; शिवसेना, काँग्रेसची मते फुटली; विधान परिषदेत भाजपचे पाचही उमेदवार विजयी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठय़ा प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला़

दहाव्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, उलटेच झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाली़  काँग्रेसने हंडोरे यांच्यासाठी पहिल्या पसंतीच्या २९ मतांची व्यवस्था केली होती. परंतु, हंडोरे यांना २२ मतेच मिळाली. यावरून काँग्रेसची सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.  

शिवसेनेचे संख्याबळ ५५ असून, तीन अपक्ष मंत्री व अन्य काही आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेला ६० पेक्षा अधिक मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मतेच मिळाली. शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५५ असल्याने तीन मते फुटल्याचे स्पष्टच दिसते. शिवसेनेबरोबर असलेल्या सहयोगी आमदारांनी मते दिली असे गृहित धरल्यास शिवसेनेची अधिक मते फुटली असावीत. शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी मतांची फाटाफूट झाल्याने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही शिवसेनेवर नामुष्की ओढवली़

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नसल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ झाले होते. खडसे यांना २९ तर रामराजे यांना २७ अशी ५६ मते मिळाल्याने राष्ट्रवादीने पाच अतिरिक्त मतांची बेगमी केली. ही मते महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची की भाजपची, अशी चर्चा सुरू झाली.

भाजपची ११ मते वाढली 

भाजपचे १०६  आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपला ११ मते अधिक मिळाली आहेत. शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. विधान परिषदेत चमत्काराचे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, पण भाजपनेच चमत्कार केला. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीची मते फोडून भाजपने सरकार डळमळीत होईल, अशा पद्धतीने पावले टाकली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ १५२ असल्याने या दोन्ही निकालांवरून सरकार लगेचच कोसळेल असे नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भरभक्कम किंवा स्थिर नाही हे स्पष्ट झाले आहे.

भाजपला १३४ मते : राज्यसभेत भाजपला १२३ मते मिळाली होती़  विधान परिषदेत १३४ मते मिळाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याचे सिद्ध झाले. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निकालांवरून महाविकास आघाडी सरकार स्थिर नाही हा संदेश गेला आहे.

महाविकास आघाडीतील प्रचंड नाराजी, असंतोष उघड झाला असून, त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. ही परिवर्तनाची नांदी आह़े राज्यात लोकाभिमुख सरकार सत्तेवर येईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहील़

                  – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली, हा आमचा दोष आह़े विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून मी त्याची जबाबदारी स्वीकारतो़ मात्र, सरकार म्हणून आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आह़े

      – बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दुसऱ्या लाटेत हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण तिप्पट ; सहा महिन्यांतच १७,८८० जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी