शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.

संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता असं त्यांचं वर्णन केलं जातं. मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते.

सुधीर जोशी यांनी भूषवलेली पदे

  • अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष.
  • अध्यक्ष / विश्वस्त – साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय.
  • कार्यकारी समिती सदस्य – गरवारे क्लब.
  • सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना.
  • विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान.
  • विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट.
  • अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष – इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष-कॅनरा बँक कर्मचारीसेना.
  • अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना.
  • अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना.

अनमोल हिरा गमावला – संजय राऊत

शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांत ते मार्गदर्शन करायचे. महापौर कसा असावा, हे सुधीर जोशींकडून आम्ही शिकलो. त्यांनी शिवसेनेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी लोकाधिकार समितीचं काम सुरू केलं. अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. सुधीर जोशींनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं. प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. उत्तम वक्ते, मितभाषी होते. एक शिवसैनिक म्हणून त्यांचा रुद्रावतार आम्ही पाहिलेला आहे. महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. दुर्दैवाने त्यांना एक अपघात झाला. त्यांचं शिवसेनेशी कायम नातं राहिलं. शिवसेनेनं सुधीर जोशींच्या रुपात एक अनमोल हिरा गमावला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते : राज्यपाल

 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.    

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader sudhir joshi died due to long illness vsk