मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येची महानगरदंडाधिकाऱ्यांसह राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी सुरू आहे. या दोन्ही चौकशींची सद्यस्थिती काय आहे ? अशी विचारणा करून त्यांची स्थिती स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चित्रीकरण आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या फोनमधील घटनेशी संबंधित नोंदी जतन करण्याचे आदेशही न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सरकारला दिले.

हेही वाचा – मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे अनुज्ञप्ती, अंतिम वाहन चाचणी बंद; २० मेनंतर उमेदवारांची चाचणी होणार

अनुजच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे, प्रकरणाच्या सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळीही अनुजच्या मृत्यूला १४ दिवस उलटून गेले असून अद्याप कोठडी मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आग्रह अनुजच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केला.

त्यावर, या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंद करण्यात आली असून राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे, कायद्यानुसार, थापनच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. असे सहाय्यक सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. असे असताना प्रकरणाचा तपास वर्ग करण्याचे एकतर्फी आदेश देऊ शकत नसल्याचे न्यायमूर्ती मारणे आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्याचवेळी, महानगरदंडाधिकारी आणि सीआयडीतर्फे प्रकरणाच्या केल्या जाणाऱ्या चौकशीची स्थिती काय ? अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली. मात्र, ही चौकशी कोणत्या टप्प्यात आहे याबाबत आपल्याला माहिती देण्यात आलेली नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने दोन्ही चौकशींची स्थिती स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.

हेही वाचा – विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक तास उशिरा प्रश्नपत्रिका, मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील प्रकार

दरम्यान, पंजाबमधील सुखचैन गावात वास्तव्यास असलेली अनुज याची आई रिता देवी यांनी राज्य सरकार आणि मुंबई गुन्हे शाखेसोबतच अभिनेता सलमान खान यालाही या याचिकेत प्रतिवादी केले आहे. अनुज याने पोलीस कोठडीत आत्महत्या केलेली नाही, तर पोलीस कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे. तसेच अनुज याच्या मृतदेहाचे नव्याने शवविच्छेद करण्याची, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणीही केली आहे.