मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिकाऊ अनुज्ञप्ती आणि अंतिम वाहन चाचणी २० मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना २० मेऐवजी २१ ते २४ मेदरम्यान बोलावण्यात येणार आहे.
परिवहन विभागाच्या अनुज्ञप्ती संबंधी सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी आणि पक्के अनुज्ञप्तीसाठी वाहनचालकांना ऑनलाइन पद्धतीने अपॉइमेंट्स घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्के अनुज्ञप्ती वाहन चालक चाचणीसाठी अनेक उमेदवार वडाळा आरटीओ कार्यालयात येणार होते. मात्र, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून या दिवशी शासकीय कार्यालये बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांची शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी २० मेऐवजी २२ मे रोजी घेण्यात येईल. तसेच पक्के अनुज्ञाप्ती वाहन चालक चाचणी २० मेऐवजी २१ ते २४ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवारांना मोबाइलवर संदेश पाठवण्यात आले आहेत, असे वडाळा आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.