मुंबई :  संस्कृती टिकली तर देश टिकतो, म्हणून सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यासाठी ७० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांतील प्रलंबित राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण सोमवारी एका भव्य सोहळय़ात मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरिजन, कलादान, कीर्तन/ समाजप्रबोधन आदी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रभादेवी येथील पु. ल देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात रंगलेल्या या राज्य सांस्कृतिक पुरस्कार सोहळय़ात बोलताना सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील सर्वात मोठे पोर्टल सुरू करण्याचा आपला संकल्प आहे. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमी या एकुलत्या एका नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले असून पुढील ३ वर्षांत अल्प दरात नाटक प्रदर्शित करण्याच्या दृष्टीनेही सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

या सोहळय़ात कृष्णा मुसळे, संदेश उमप, संघपाल तायडे, सावनी रवींद्र, कार्तिकी गायकवाड, संपदा दाते, शिल्पी सैनी, संतोष साळुंखे, संपदा माने आणि  भजनसम्राट ओमप्रकाश आदी कलाकारांनी नृत्य, नाटय़, भक्तीसंगीत-लोकसंगीत असे विविध कार्यक्रम सादर केले.

‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’, ‘नभ उतरू आलं’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘नरवर कृष्णसमान’, ‘खोडय़ा नको करू रे’, ‘राधे राधे घेई शाम सुंदरा’

आदी विविध मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. भारुडे, शाहिरी पोवाडे, संतरचनांचेही सोहळय़ात सादरीकरण करण्यात आले. अभिनेत्री समीरा गुजर यांनी सोहळय़ाचे सूत्रसंचलन केले.

राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी

* २०२०चे मानकरी – कुमार सोहोनी(नाटक), पंडितकुमार सुरुशे (कंठसंगीत), शौनक अभिषेकी (उपशास्त्रीय संगीत), मधू कांबीकर (मराठी चित्रपट), ज्ञानेश्वर वाबळे (किर्तन), अवधूत विभुते (शाहिरी), शुभदा वराडकर (नृत्य), अन्वर कुरेशी (कलादान), सुभाष खरोटे (वाद्यसंगीत), शिवाजी थोरात (तमाशा), सरला नांदुरेकर (लोककला), मोहन मेश्राम (आदिवासी गिरीजन).

* २०२१चे मानकरी – गंगाराम गवाणकर (नाटक), कल्याणजी गायकवाड (कंठसंगीत), देवकी पंडीत (उपशास्त्रीय संगीत), वसंत इंगळे (मराठी चित्रपट), गुरुबाबा औसेकर (किर्तन), कै. कृष्णकांत जाधव (शाहिरी), जयश्री राजगोपालन (नृत्य), देवेंद्र दोडके (कलादान),  ओंकार गुलवडी(वाद्यसंगीत), सुरेश काळे (तमाशा), कमलबाई शिंदे (लोककला), गणपत मसगे (आदिवासी गिरीजन)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar announce crore fund for cultural sector in maharashtra cultural award distribution event zws