Elphiston Bridge Project Affected Meet Raj Thackeray : अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडण्यात येणार आहे. या पुलाच्या कामात १९ इमारती बाधित होणार आहेत. या प्रकल्पबाधितांचं पूनर्वसन होत नाही तोवर पुलाच्या कामाला सुरुवात न करण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यामुळे आतापर्यंत हे काम दोनवेळा स्थगित करण्यात आलं आहे. आता प्रकल्पबाधितांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली.

मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या पुलाचे काम हाती घेण्यात आले असून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर) बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएने आधी १५ एप्रिल आणि मग २५ एप्रिल रोजी वाहतुकीसाठी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिक प्रकल्पबाधितांच्या आंदोलनामुळे या पाडकामाला स्थगिती देण्यात आली. योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय पूल वाहतुकीसाठी बंद करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका १९ इमारतींमधील रहिवाशी शुक्रवारी घेतली.

रस्त्यावर उतरून आंदोलन करीत त्यांनी पूल वाहतुकीसाठी बंद करू दिला नाही. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत १९ इमारतींचे तिथल्या तिथे पुनर्वसन केले जाईल, असा निर्णय घेतला. या आंदोलनात मनसेनेही पुढाकार घेतला होता. आता या प्रकल्पबाधितांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी या प्रकल्पबाधितांना दिलासा दिला आहे.

“जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलुन घ्या”, असं राज ठाकरेंनी प्रकल्पबाधितांना म्हटलंय. यासंदर्भात मनसे अधिकृतच्या एक्स खात्यावर माहिती देण्यात आली.

“मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाशांना घरे खाली करण्य‍ाची शासनाकडून नोटीस देण्यात आली मात्र घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू होताच स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून व्यथा मांडली. राज ठाकरेंनी या प्रकरणात नागरिकांना धीर देऊन “जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबीही दिली”, अशी पोस्ट या एक्स खात्यावरून करण्यात आली आहे.

शिवडी-वरळी उन्नत रस्त्याअंतर्गत नवीन पूलाची बांधणी

दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबईत पोहचता यावे अर्थात अटल सेतूवर जाता यावे यासाठी एमएमआरडीएने शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे काम हाती घेतले आहे. हा उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरुन जाणार होता. मात्र सध्याच्या प्रभादेवी पुलाची दुरवस्था पाहता एमएमआरडीएने प्रभादेवी पूल पाडत त्या जागी नवीन पूल बांधण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी पूल पाडत त्या जागी द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा एक स्तर सध्याचा पुलाच्या जागेवर असणार असून दुसरा स्तर त्यावरुन जाणार आहे. पहिल्या स्तरावरून सध्या ज्या प्रमाणे स्थानिक वाहतूक सुरु आहे, तशी वाहतूक सुरु राहणार आहे. तर त्यावरील स्तरावरून अटल सेतूकडे येणारी-जाणारी वाहतूक सुरु राहणार आहे. तेव्हा सध्याचा पूल पाडत त्या जागी पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएकडून मागील कित्येक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून परवानगी मागितली जात होती. मात्र ही परवानगी मिळत नसल्याने पुलाच्या पाडकामास आणि नवीन पूल बांधण्यास पर्यायाने उन्नत रस्त्यास विलंब होत होता.