मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला पण प्रत्यक्षात न साकारलेला मुंबई आय हा प्रकल्प आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. एमएमआरडीएकडील हा प्रकल्प आता पालिकेच्या माथी मारला जात असल्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. अनेक रहिवासी संघटनांनी या प्रकल्पाला आधीच विरोध सुरू केला असून त्याविरोधात ऑनलाईन याचिकाही तयार करण्यात आल्या आहेत. आधी चांगल्या सोयी सुविधा द्या अशी मागणी रहिवासी संघटना करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लंडन आय या अतिभव्य आकाशपाळण्याच्या धर्तीवर मुंबईतही मुंबई आय उभारण्याची घोषणा गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. राज्य सरकारने २०२० मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्यावर्षी एमएमआरडीच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येणार होता. त्यासाठी बीकेसीच्या जागेचा पर्यायही पुढे आला होता. मात्र तेथील रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर हा प्रकल्प बारगळला. आता हा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आय या प्रकल्पाविषयी चर्चा सुरू आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे तीन ते चार एकर जागा लागणार आहे. एवढी मोठी जागा मिळवणे हे अवघड नाही पण ७० मीटर उंचीवरून या आकाशपाळण्यातून मुंबईतील विहंगम दृश्य दिसावे अशी पर्यटकांची अपेक्षा असते. मात्र या पाळण्यातून केवळ झोपड्याच दिसणार असतील तर हा प्रकल्प यशस्वी कसा होईल अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, समाजमाध्यमावर या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला आहे. मुंबईची हवा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाते, मुंबईतील हिरवळ नष्ट होत चालली असूून मुंबईला बकाल स्वरुप आले आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी मुंबई महापालिकेने मुंबई आय सारखा प्रकल्प हाती घेऊ नये अशी भूमिका समाजमाध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे. झटका डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर मुंबई आय विरोधात ऑनलाईन याचिका करण्यात आली असून त्यावर आठ हजाराहून अधिक मुंबईकरांनी स्वाक्षरी केली आहे.

आता बिपीटीच्या जागेचा पर्याय

मुंबई आय उभारण्यासाठी समुद्राच्या जवळची जागा योग्य आहे. त्यामुळे बीपीटीच्या जागेवर या प्रकल्पासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बीपीटीचा ईस्टर्न वॉटर फ्रंटचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यात मुंबई आयसाठी जागा आरक्षित आहे. परंतु, या प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबई आय प्रत्यक्षात येईल का किंवा कधी येईल याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही शंका आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mumbai eye project will now be implemented through mumbai municipal corporation mumbai print news sud 02