मुंबई : मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील शिर्डी ते भरवीर ८० कि.मी.चा दुसरा टप्पा शुक्रवारपासून (२६ मे) वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून शिर्डी ते भरवीर अंतर ४० ते ४५ मिनिटांत आणि नागपूर ते भरवीर अंतर पावणे सहा तासांत कापता येईल. राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडून त्यांतील अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. ७०१ किमीच्या मुंबई ते नागपूर या मार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शिर्डी ते भरवीर या टप्प्याचे उद्घाटन १ मे रोजीच करण्यात येणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नव्हती. आता २६ मे रोजी दुपारी ३ वाजता शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
भरवीर-इगतपुरी काम वेगाने
सध्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. बांधकामाच्या दृष्टीने हा टप्पा आव्हानात्मक आहे. त्यामुळे हा टप्पा पूर्ण होण्यास किमान चार महिने लागतील. हा टप्पा दसरा-दिवाळीदरम्यान वाहतुकीस खुला होण्याची शक्यता एमएसआरडीसी’ने व्यक्त केली.