कधीही न थांबणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा वेग मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मंदावला आहे. लोकल ट्रेन, रस्ते वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे. सोमवारी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उशीरा सुरु असणारी लोकल ट्रेनची वाहतूक आणि रस्त्यांवरील गाड्यांच्या रांगाचे चित्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही दिसले. सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने रात्री उशीरा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. तर पहाटेच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या ट्विटवर हॅण्डलवरुन अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले. मात्र आता याच मुद्द्यावरुन भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये ट्विटरवॉर सुरु झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये, ‘मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे,’ असे म्हटले होते.

याच ट्विटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. सुट्टी जाहीर करणं, अतिवृष्टीचा इशारा देणं, लोकांनी घराबाहेर पडू नका, हे सांगणं एवढंच प्रशासनाचं काम आहे का? असा सवाल राष्ट्रवादीने ट्विटवरुन हे ट्विट कोट करत मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत उपस्थित केला. ‘सुट्टी जाहीर करणं, अतिवृष्टीचा इशारा देणं, लोकांनी घराबाहेर पडू नका, हे सांगणं एवढंच प्रशासनाचं काम आहे का? रस्त्यावर ना पोलिस आहेत, ना पालिका कर्मचारी, ना प्रशासनाचे आपत्कालीन प्रतिनिधी. जनता वार्‍यावर आणि अर्थातच पावसावर आहे,’ असं राष्ट्रवादीने या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

राष्ट्रवादीच्या याच ट्विटला महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटवर हॅण्डलवरुन ‘उघडा डोळे, बघा नीट!’ अशा खोचक शब्दांमध्ये उत्तर देण्यात आले. या ट्विटमध्ये भारतीय नौदालाच्या मदतकार्यचे फोटो असणाऱ्या ट्विटची लिंक महाराष्ट्र भाजपाने ट्विट केली. त्याचबरोबर ‘ट्वीट करण्याआधी थोडा अभ्यास करत जा’ असा सणसणीत टोलाही भाजपाने राष्ट्रवादीला लगावला आहे. ‘रस्त्यावर आपत्कालीन प्रतिनिधी लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. ट्वीट करण्याआधी थोडा अभ्यास करत जा, नाही तर व्हर्चुअल जगात देखील उघडे पडाल, प्रत्यक्ष जमीनस्तरावर आधीच लख्तरे निघालेली आहेत!,’ अशा शब्दात महाराष्ट्र भाजपाने राष्ट्रवादीवर पलटवार केला.

दरम्यान एकीकडे ट्विटवर वाद सुरु असतानाच आता मुंबई तुंबण्यावरुन पुन्हा राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनीही घरात साचलेल्या गुडघाभर पाण्याचे फोटो ट्विट करत करुन दाखवलं असा खोचक टोका भाजपाचे मित्रपक्ष असणाऱ्या आणि महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला लगावला आहे. तर मुंबईच्या महापौरांनी मुंबई तुंबलीच नाही असं सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter war between ncp and bjp over mumbai rain and flooding issue scsg