मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणेदरम्यानचा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार आणि नागपूर – मुंबई थेट प्रवास आठ तासात केव्हा करता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आतापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिल्या, मात्र या सर्व तारखा चुकल्या. आता महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा एमएसआरडीसीत सुरू आहे. यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केल्याचे समजते.
सध्या ६२५ किमी लांबीचा महामार्ग सेवेत
एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा आणि ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा नागपूर – मुंबई मसृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा संपूर्ण महामार्ग याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. दरम्यान, टप्प्याटप्प्याने आतापर्यंत ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता इगतपुरी – आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासात नागपूर गाठता येणार आहे. आता ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. आता शेवटच्या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी या टप्प्याचे लोकार्पण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
लोकार्पणाचा भव्य सोहळा ?

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

इगतपुरी – आमणे टप्पा १ मे रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने प्रकल्पस्थळी साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकार्पणाच्यादृष्टीने इतरही तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकार्पणाचा मोठा सोहळा होणार असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचे कामही सुरू असल्याचे समजते. त्यामुळे १ मे रोजी आता इगतपुरी – आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापक संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणीतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will the last phase of the igatpuri aamne samruddhi highway be inaugurated mumbai print news amy