गडचिरोली : दोघांसह तिसऱ्या मुलालादेखील मुलगी झाल्याने नाराज कुटुंबाने एका महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याची संतापजनक घटना देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली आहे. दोन महिन्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आई वडिलांसह आजी व आजोबाला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव (ह.) येथील गोपीनाथ प्रधान यांच्या दोन्ही मुलांना मुली आहेत. मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या या कुटुंबातील भास्कर गोपीनाथ प्रधान याची पत्नी निशा ही तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. मार्च महिन्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, दोन्ही मुलांना मुलीच असताना निशाला तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने कुटुंब नाराज होते. २४ एप्रिल रोजी निशाच्या एक महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केले.

हेही वाचा – Buldhana Bus Accident : “…अन् ते लहान मुल होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले,” प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग

चिमुकलीला कुटुंबीयानेच संपविल्याची कुणकुण पोलिसांना लागली. यावरून पोलिसांनी चौकशी केली असता चिमुकली बेपत्ता झाल्याचा कांगावा कुटुंबीयांनी केला होता. पोलिसी खाक्या दाखवताच सत्य बाहेर आले. दोन महिने पोलिसांनी गोपनीयरीत्या तपास केला. यात मुलीची पुत्रप्रेमापोटी कुटुंबीयाने मिळून हत्या केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. अखेर दोन महिन्यांनंतर पोलिसांनी आई निशा, वडील भास्कर, आजी सुनीता व आजोबा गोपीनाथ प्रधान या चौघांना घरातून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A baby murder by family in dongargaon in desaiganj taluka ssp 89 ssb