गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यभरात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली असताना गडचिरोलीतदेखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमधील तीन नाराज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला ऐन निवडणुकीत बळ मिळाल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून बोलले जात असले तरी स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षात आलेल्या या आयारामांमुळे आपले भविष्यातील राजकारण धोक्यात आल्याची कुजबुज या नेत्यांच्या गोटात आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना गडचिरोली-चिमूर जागेकरीता महायुती आणि महाविकासआघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. तोपर्यंत झालेल्या विलंबामुळे नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली होती. मात्र, त्यांनंतर जिल्ह्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या. महायुतीत घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोलीच्या जागेवर केलेला दावा भाजपने मोडून काढला. परंतु काँग्रेसमध्ये तिकिटासाठी सुरू असलेल्या अंतर्गत स्पर्धेने उग्र रूप घेतले आणि इच्छुक उमेदवार डॉ. कोडवते दाम्पत्य, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपची वाट धरली.

हेही वाचा- मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. दुसरीकडे आयारामांची संख्या वाढल्याने भाजपमधील नेते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते आणि डॉ. नामदेव उसेंडी हे तिन्ही नेते काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक होते. यातील डॉ. नामदेव उसेंडी हे एकदा आमदार राहिले आहेत. तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर डॉ. चंदा कोडवते यांनी देखील भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांच्याविरोधात विधानसभा लढवली आहे. आता या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत यामुळे भाजपला फायदा होईल असा कयास वरिष्ठ नेतृत्वाकडून बांधला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. या तीन नेत्यांच्यामागे कोणताही जनाधार नसल्याने त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे काँग्रेसला फारसे नुकसान होणार नाही, असा दावा काँग्रेसचे पदाधिकारी करीत आहेत. उलट यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील असेही त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

लोकसभेनंतर काही महिन्यांतच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी झालेल्या प्रवेशावेळी डॉ. उसेंडी यांना विधानसभेचे आश्वासन दिले गेले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार होळी यांची चांगलीच कोंडी होणार आहे. दुसरीकडे डॉ. मिलिंद नरोटे रांगेत आहे. नुकतेच आलेले कोडवते दाम्पत्य देखील दावेदार असतील. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून काल देवेंद्र फडणवीस यांच्या संभेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये हीच चर्चा होती. हे विशेष.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पडली भर

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री धर्मरावबाबा इच्छुक होते. परंतु फडणवीसांनी अजित पवारांची कोंडी करत ही जागा भाजपकडेच ठेवली. त्यामुळे विधानसभेत जागावाटपात भाजपला मित्रपक्षातील नेते धर्मरावबाबा आत्राम यांना झुकते माप द्यावे लागेल. तसा शब्द त्यांना दिल्याचे कळते. त्यामुळे अहेरी विधानसभेत आत्राम राज घराण्यातील अम्ब्रीशराव आत्राम यांची जागा धोक्यात आली आहे. तसेही मागील काही महिन्यांपासून त्यांच्या लेटलतिफ कारभारावर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व नाराज असल्याचे कळते. त्यामुळे भविष्यात महायुतीत संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.