नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा गुरुवारी दुपारपर्यंत सुरू होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींच्या तिरक्या चालीमुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अंतिम टप्प्यात आलेल्या सत्तानाटय़ाने गुरुवारी वेगळे वळण घेतल़े नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, हे जवळपास निश्चित मानले जात होत़े ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्रीच फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर ढोलताशे वाजवून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नागपुरातील भाजपचे नेते पुन्हा फडणवीसांना संधी मिळणार हे गृहीत धरून दिवसभर एकमेकांना शुभेच्छा देत होते. संघ वर्तुळातही आनंदाचे वातावरण होते. सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, हे गृहीत धरून शहर भाजपने जल्लोषाची जय्यत तयारीही केली होती. पण, दुपारी अचानक फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करत आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करताच नागपूरकरांना पहिला धक्का बसला. त्यातून सावरत समर्थकांनी फडणवीस कसे उदार मनाचे आणि पक्षहितासाठी सत्तेला दूर सारणारे आहेत, अशी चर्चा सुरू केली. परंतु, सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांनी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे, असे निर्देश जाहीरपणे दिल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांसाठी हा दुसरा धक्का होता. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी पक्ष कार्यालयासमोरील सायंकाळचा जल्लोषही आटोपता घेतला. पक्षांतर्गत कुरघोडीतून हा प्रकार घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलण्यास तयार नव्हते.