नागपूर: ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीचा प्रत्यय जरीपटका रेल्वे उड्डाण पुलाच्या बाबतीत या परिसरातील सुमारे एक लाखांहून अधिक नागरिकांना येऊ लागला आहे. सत्ताधारी पक्षाने आपल्या नेत्याच्या फायद्यासाठी उड्डाण पुलाचा मूळ आराखडा बदलला. त्यामुळे या भागातील चार वस्त्यांतील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या इटारसी रेल्वे उड्डाण पुलाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. या उड्डाण पुलासाठी ८० कोटीला २०२१ मध्ये मंजुरी मिळाली होती. केंद्र सरकारच्या निधीतून पूल उभारण्यात येत आहे. रेल्वे मार्गावरील जुना पूल तोडून नवीन पूल उभारण्याची मूळ कल्पना होती. एनएडीटी ते जरीपटका असा पूल बांधायचा होता. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र, काही महिन्यात मूळ बांधकाम नकाशात बदल करण्यात आले. या बदलामुळे पुलाची लांबी वाढली. तसेच या पुलाला लागून आणखी एका पुलाचे नियोजन करण्यात आले. यामुळे नझुल लेआऊट, लुंबीनीनगर, गौतमनगर, दिलीपनगर, ख्रिश्चन कॉलनी आणि बेझनबाग यांची वाहतूक कोंडी होणार आहे. पुलाच्या कामासाठी सर्व वाहतूक नझुल लेआऊट कॉलनीच्या मुख्य रस्त्यावरून वळवण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा… नागपूर: पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने तर डोक्यावर कुऱ्हाडीने वार…

नझुल लेआऊट कॉलनीतील मुख्य रस्ता हा जवळपास एक लाख लोक वापरत असून नवनिर्मित इटारसी पुलाच्या सदोष डिझाईन आणि बांधकामाच्या अनियमितेमुळे नझुल लेआऊट कॉलनीचा मुख्य रस्ता बंद होत आहे. तसेच वसाहतीत येणाऱ्या रुग्णवाहिका, स्कूल बस, महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या, वॉटर टँक, अग्निशामक वाहनाची ये-जा बंद होण्याच्या स्थितीत आहे. मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांना भेटून या पुलामुळे होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन दिले आहे. परंतु, स्थानिकांच्या मागणीकडे कोणही लक्ष देण्यास तयार नाही.

कॉलनीतून बेकायदेशीरपणे वळवण्यात आलेल्या असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हिस लाईन्स वसाहतीतून वळती केली असल्याने प्रकल्पाच्या लांबीत पर्यायाने किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे या भागातील नागरिक सुजीत रोडगे यांनी सांगितले.

हेही वाचा… विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंड; मुंबई व कोकण विभागात तापमानात वाढ

राजकीय दबावाखाली दुसऱ्या पुलाचे (सेकंड आर्म) सी.एम.पी.डी.आय. ते मेकोसाबाग दिशेने काम प्रस्तावित करण्यात आले. सीएमपीडीआय आणि त्या परिसरात कोणाचे रिअल इस्टेट प्रकल्प सुरू आहेत. हे बघितल्यास मूळ पुलाचा नकाशा बदलून स्थानिकांना नागरिकांना वेठीस धरण्यात सत्ताधारी का तयार आहेत, असे दिसून येईल, असा दावा अभिजीत गजभिये यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच रेल्वेचे अधिकारी जयेश सिन्हा यांच्याशी या पुलाच्या बांधकामबाबत संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

‘पूल दिवाळीपूर्वी सुरू करावा’

जरीपटका येथील व्यापारी मात्र हा उड्डाण पूल दिवाळीपूर्वी सुरू व्हावा यासाठी प्रयत्नरत आहेत. पुलाचे काम सुरू असल्याने व्यापार बुडाला आहे. गेल्या दोन वर्षापासून दिवाळीत रेल्वे रुळापलीकडील लोक जरीपटका बाजारपेठ येऊ शकले नाही. त्यामुळे तातडीने पूल वाहतुकीसाठी सुरू व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक किशन बालानी यांनी केली आहे.

एखादा वस्तीला विशेष सुविधा देण्यासाठी अन्य वस्त्यांमधील लोकांचे हक्क डावलेले जाऊ शकत नाही. सी.एम.पी.डी.आय.कडे थेट पोहचता यावे म्हणून मूळ आराखडा बदलण्यात आला. आता अपूर्ण पुलाचे सुरक्षितता तपास (सेफ्टी ऑडिट) न करता लोकार्पण करण्याचा घाट रचला जात आहे. – सुजीत रोडगे, स्थानिक नागरिक.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are facing traffic jams due to changing the original layout of jaripatka flyover nagpur rbt 74 dvr