नांदेड : विभागीय आयुक्तालयाच्या मागणीसाठी शुक्रवारी लातूर येथे आंदोलन होत असताना १५ वर्षांपूर्वी याच विषयात आपले हात पोळवून घेणारे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर येथील पायाभूत सुविधांचा उल्लेख करून आयुक्तालयासाठी नांदेडच योग्य असल्याचे सूचित केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह या विभागाचा राज्यभरातील वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या वरील उदघाटन सोहळ्याला संबंधित मंत्र्यांनी दांडी मारली तरीही भाजपमध्ये गेल्यानंतर चव्हाण यांनी प्रथमच आयुक्तालयाच्या विषयावर मतप्रदर्शन केले.२००९ साली मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी दुसरे महसूल आयुक्तालय नांदेडला करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. पण हाच निर्णय नंतर राजकीयदृष्ट्या त्यांच्या अंगलट आला. न्यायप्रविष्ट बाब तसेच नांदेड लातूर आणि परभणी यांच्यातील वादात नियोजित आयुक्तालय १५ वर्षांपासून लालफितीत अडकले आहे. 

सुमारे पंधरवड्यापूर्वी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आयुक्तालयाच्या विषयात हात घालण्याचे सूतोवाच नांदेडमध्येच केले होते. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आपल्या दाव्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. तर इकडे नांदेडमध्ये चव्हाण यांनी नांदेड शहर आणि जिल्ह्यात पायाभूत सुविधांची कमतरता नाही याकडे लक्ष वेधून आयुक्तालयाची मागणी पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार हे वरील उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या उपस्थितीत खा. चव्हाण यांनी आयु्क्तालयाच्या विषयात हात घातला, तरी त्यावर राजेशकुमार यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm ashok chavan after inaugurating revenue sports competition called nanded ideal for commissionerate sud 02