लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती: जिल्‍ह्यात शुक्रवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. एका व्‍यक्‍तीचा वीज पडून मृत्‍यू झाला, तर सुमारे ११२ घरांची पडझड झाली. काही भागात गारपिटीने शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्‍हा प्रशासनाच्‍या नजर अंदाजानुसार जिल्‍ह्यात एकूण ५२२ हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली असून गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्री, आंबा आणि काढणीला आलेल्या हरभरा पिकाला फटका बसला आहे.

जिल्‍ह्यात सर्वाधिक २८८ हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान अंजनगाव सुर्जी तालुक्‍यात झाले आहे. १६० हेक्‍टरमध्‍ये नुकसान अमरावती तालुक्‍यात झाले आहे. भातकुली तालुक्‍यात ३४, नांदगाव खंडेश्वर २८ आणि दर्यापूर तालुक्‍यात १२ हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली आहे. जिल्‍ह्यात एका घराची पूर्णत: तर १११ घरांची अंशत: पडझड झाली आहे. २ मोठ्या जनावरांचा मृत्‍यू झाला आहे.

आणखी वाचा- अमरावती : मुलीची छेड काढणाऱ्याला‎ हटकले; तरुणाने आईवर केला हल्ला

जिल्‍ह्यात गेल्‍या चोवीस तासांत १३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २९.६ मिमी पाऊस तिवसा तालुक्‍यात झाला. नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात २१.६ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील मलापूर येथे शेत शिवारात वीज पडून गोपाल मनोहर करपती (३५) यांचा मृत्यू झाला असून विनायक ठवकर अंदाजे (३०) आणि जगदीश मंडाले (३७) हे जखमी झाले आहेत. दोघांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती धामणगाव रेल्वे तहसीलदारांकडून प्राप्त झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage of farm in 522 hectares due to stormy rains in amravati mma 73 mrj