वाशीम : ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली. सन २०२१ २०२२ पासून जिल्हयात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला. ५७२ योजनांचा यामध्ये समावेश असून या योजनेवर १९८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यापैकी १२६ योजना पूर्ण झालेल्या असून ४४६ योजनांची कामे सुरु आहेत. पावसाळा तोंडावर असल्यामुळे उर्वरित योजना पुर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन योग्य ती पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील जनतेला नळ जोडणीच्या माध्यमातून शुध्द व स्वच्छ पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना आणली. सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन मिशनचे मुख्य उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत वाशीम जिल्हा परिषदेतून ५७२ योजनांचे आराखडे तयार करण्यात आले होते. सन २०२१ २०२२ मध्ये निविदा प्रक्रीयाही पार पडली. सन २०२१ २०२२ पासून बहुतांश कामाला सुरवात झाली.

हेही वाचा : वर्धा : वन्यजीव निरीक्षणावेळी मचाणीवरच मिळणार भोजन, ‘ही’ खबरदारी घ्या

काही कामांची निविदा नंतर होऊन कामाची कामाची संख्या वाढत गेली. मात्र अल्पावधीतच अनेक गावातून कामांच्या तक्रारी देखील वाढल्या असून कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई होत असल्याचा आरोपही झाला. आधी २०२४ मध्ये पुर्ण होण्याचा कालावधी असतांना त्यमध्ये वाढ होऊन २०२५ पर्यत पूर्ण करण्याचा कालावधी आहे.

मागील काही वर्षात ५७२ योजनांपैकी केवळ १२६ योजनांच पुर्ण झाल्या असून यावर आतापर्यत १९८ कोटी रुपयाचा खर्चही करण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असली तरीही जलजीवन मिशनची गती मात्र मंदावलेलीच आहे.

हेही वाचा : यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारी संस्थांमधील अनिष्ठ तफावत ७०० कोटींवर, पीक कर्ज वाटपात दिरंगाई

बहुतांश ठिकाणी होत असलेल्या कामांच्या तक्रारीही करण्यात आल्या असल्यामुळे कामाचा दर्जा तपासण्याची मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.