नागपूर : भरडधान्याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या सर्वत्र गहू, तांदूळ, साखर आणि इतर पदार्थांचे सेवन वाढले. त्यामुळे मधुमेहासह इतर आजारांना आमंत्रण मिळाले. देशात भरडधान्य उत्पादनाला प्राधान्य देऊन रोजच्या आहारात भरडधान्याचा समावेश झाल्यास विविध आजार पळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन पद्मश्री व आहार तज्ज्ञ डॉ. खादर वल्ली यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. डॉ. वल्ली म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी देशात पारंपरिक पद्धतीने ज्वारी, नाचणी, बाजरा, मकासह इतरही भरडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. हे धान्य आपल्याकडील कोणत्याही वातावरणात पिकत असल्याने ते दैनिक आहारातही होते. या पदार्थांमुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली होती. कालांतराने अन्नधान्य क्षेत्रात कापोर्रेट जगताचा हस्तक्षेप वाढला. या क्षेत्राने तांदूळ, गहूसह काही धान्यांचे स्वामित्व हक्क (पेटंट) घेतले. सरकारवर दबाव वाढवल्यावर या धान्यांना अनुदान मिळाल्याने देशात या पिकांचे उत्पादन वाढण्यासह सेवनही वाढले. आता दैनंदिन आहारात तांदूळ, गहू, साखरसह इतर पदार्थ आल्याने मानवाच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हल्ली मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही रुग्ण वाढत आहेत. देशात पुन्हा मोठे धान्य असलेले नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, चना आणि लहान धान्य असलेले कोद्रा, कुटकी, हिरवा कंगना, सावा, कांगनी आणि इतर काही धान्याचे उत्पादन वाढवून त्याचे दैनंदिन सेवन वाढल्यास मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही आजार पळवणे शक्य आहे.

हेही वाचा – ‘या’ ठिकाणी श्रद्धेपोटी केला जातो विडी, तंबाखूचा नैवेद्य अर्पण

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात अपघातांच्‍या प्रमाणात वाढ; अडीच वर्षांत १ हजारांवर बळी

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास उपयुक्त

भरडधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनुदान व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भरडधान्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह आजारावर नियंत्रणाची प्रचंड ताकद आहे. या पिकांचे कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासह ते कोणत्याही तापमानात होणे शक्य असल्याचेही डॉ. वल्ली म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include pulses in diet ward off disease says padmashri dr khadar valli mnb 82 ssb