अमरावती : मेळघाटातील राजदेवबाबा हे ठिकाण वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आदिवासी लोक या ठिकाणी मुर्तीला श्रद्धेपोटी तंबाखू, विडीचा नैवेद्य अर्पण करतात. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा संशोधनाचा विषय झाला आहे. चिखलदरा तालुक्यातील खोंगडा गावापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोट ते धारणी फाट्यावर राजदेवबाबाची मूर्ती आहे. याच राजदेवबाबांना विडीवाले बाबा या नावाने ओळखले जाते. येथील आदिवासी कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी याठिकाणी विडी, तंबाखूचा नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे, लग्नाची पहिली पत्रिका राजदेवबाबांच्या चरणी अर्पण केली जाते. याठिकाणी भेट देणारा प्रत्येक जण श्रद्धेपोटी राजदेवबाबाला विडी, तंबाखू, सिगारेटचा नैवेद्य अर्पण करतो. त्यामुळे राजदेवबाबांच्या मुर्तीच्या मुखात नेहमी विडी, सिगारेट पाहायला मिळते. अवतीभवती विविध प्रकारच्या तंबाखू, गुटख्याच्या पुड्या दिसून येतात. हेही वाचा : महाराष्ट्रातील वलयांकित वाघ नेमके गेले कुठे?; मृत्यू की शिकार हे गुलदस्त्सात; वनखात्याकडे नोंदच नसल्याने संभ्रम आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजदेवबाबा खरोखरच विडी पितात काय? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, मेळघाट दर्शन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना विडीवाले बाबांच्या ठिकाणाला भेट देण्याची कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येते.