नागपूर ः आयुष्यात खचल्यानंतर किंवा मान-अपमानानंतर आत्महत्येचा पर्याय स्वीकरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या वर्षभरात नागपुरातील ६७४ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तब्बल ५०४ जणांनी कौटुंबिक तणावातून किंवा वादातून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आकडेवारी शहर पोलीस विभागात नोंदविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्महत्या करण्याची वेगवेगळी कारणे असून त्यामध्ये भावनिकता, मान-अपमान, कौटुंबिक ताण, प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधाचा समावेश आहे. रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे किंवा क्षणिक रागातून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना शहरात उघडकीस आल्या आहेत.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांसह युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या वर्षभरात शहरातील ६७४ जणांना आत्महत्या केल्याची नोंद नागपूर पोलिसांनी घेतली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या गळफास घेऊन, विष प्राशन करुन आणि पाण्यात उडी घेऊन केल्याची नोंद करण्यात आली.

सर्वाधिक आत्महत्या गळफास घेऊन केल्याची निदर्शनात आले असून ५०५ जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे चित्र आहे. घरगुती वादातून किंवा कौटुंबिक ताण सहन न झाल्यामुळे ३९८ पुरुषांनी आत्महत्या केली आहे तर १०४ महिलांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. तसेच ७८ जणांनी मानसिक तणाव सहन न झाल्यामुळे आत्महत्या केली आहे तर यापेक्षा वेगळे कारण असल्यामुळे ६३ जणांनी आत्महत्या केली.

युवक व युवतींनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये वेगवेगळी कारणे समोर आली आहे. कुटुंबियांना प्रेमप्रकरण माहिती झाल्यानंतर लग्नास विरोध केल्यामुळे काही तरुण-तरुणींनी आत्महत्या केली तर काही विवाहित महिला आणि पुरुषांचे अनैतिक संबंध कुटुंबासमोर आल्यामुळे समाजात बदनामीच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनैतिक संबंधातून आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित महिलांचा सर्वाधिक टक्का असल्याची नोंद पोलिसांनी घेतली.

महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या जास्त

गेल्या वर्षभरात झालेल्या आत्महत्यांमध्ये तरुणी किंवा महिलांपेक्षा पुरुषांचा टक्का जास्त आहे. ६७४ पैकी ५४६ पुरुषांनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये १० अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच  वर्षभरात १२८ मुली-महिलांनी आत्महत्या केली असून त्यामध्ये १३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या चौपट असल्याचे दिसून येते. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८ ते ३० या वयोगटातील सर्वाधिक युवा असल्याची माहिती समोर आली.

कौटुंबिक नातेसंबंधामधील ओलावा संपला आहे. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबात एकमेकांच्या समस्या, अडी-अडचणी समजून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नाही. कुटुंबात पूर्वीप्रमाणे आता चर्चा, संवाद साधल्या जात नाही. त्यामुळे कुणाच्या मनात काय सुरु आहे?, हे समजायला पर्याय नाही. लोक आत्ममग्न झाली आहेत. अशा स्थितीत एकमेकांचे दुःख समजून घ्यायला कुणालाच वेळ नाही. अशा स्थितीत व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.- प्रा. राजा आकाश (मानसोपचार तज्ञ)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in suicides due to love affairs family disputes adk 83 amy