Premium

हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

दहीहंडी कार्यक्रमाच्‍या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर केलेल्‍या टीकेनंतर आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले आहेत.

Yashomati Thakur on Navneet Rana
हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अमरावती : दहीहंडी कार्यक्रमाच्‍या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर केलेल्‍या टीकेनंतर आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले आहेत. यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचा उल्‍लेख जातचोर असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीअंतर्गत राखीव आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.

हेही वाचा – नागपुरात हरवलेला तेलंगणातील रुग्ण दीड महिन्यांनी घरी; निराधार म्हणून मेडिकलमध्ये उपचार आणि…

कॉंग्रेसच्‍या जनसंवाद यात्रेदरम्‍यान तिवसा येथे बोलताना यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, राणा दाम्‍पत्‍य माझ्या विषयी खूप खालच्‍या स्‍तरावर बोलल्‍याचे मला ऐकू आले आहे. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्‍यावरही त्‍यांनी टीका केली, पण बळवंत वानखडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवलेले नाही. गरीब माणसांची किंमत त्‍यांना नाही. जातचोर या ठिकाणी आले होते. ते काय पैशांच्‍या गोष्‍टी करताहेत. आम्‍ही, आमच्‍या वडिलांनी, आजोबांनी लोकांसाठी जमिनी विकल्‍या आहेत. आम्‍ही बारदाना भरण्‍याचे काम केले आहे, आम्‍ही बारदाना खाली करण्‍याचे काम केलेले नाही.

राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यासोबत यशोमती ठाकूर यांनी भाजपामध्‍ये प्रवेश करण्‍याचा निर्णय घेतला होता, पण देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद देण्‍याचे नाकारल्‍याने त्‍यांनी निर्णय बदलला, असा दावा रवी राणा यांनी केला होता, त्‍यावर यशोमती ठाकूर यांनी प्रत्‍युत्‍तर दिले. त्‍या म्‍हणाल्‍या, आमच्‍या नादी लागायचे नाही. आम्‍ही सच्‍ची माणसे आहोत. आम्‍ही कॉंग्रेस पक्ष सोडू शकत नाही. तुम्‍ही लोक लाख प्रयत्‍न करून पहा. तो कधीही यशस्‍वी होणार नाही.

हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा : बुलढाणा जिल्हा, आयोजकांसह इतर भागांतही उत्सुकता!

यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, यापूर्वी नवनीत राणांनी मी सावळी आहे, माझ्या चेहऱ्यावर खड्डे आहेत, असा उल्‍लेख केला होता. हो मी सावळी आहे. शेतकऱ्यासारखा माझा रंग आहे. माझ्या चेहऱ्यावर खड्डे आहेत, माझ्या पायावर भेगा आहेत. कारण माझा विठुरायापण सावळा आहे. नवनीत राणांच्‍या थोतांडाला सर्वजण जाणून आहेत. सून म्‍हणून आम्‍ही सन्‍मान दिला. निवडून आणण्‍यासाठी आम्‍ही रात्रंदिवस झटलो, पण तुम्‍ही लगेच रंग बदलला. तुम्‍ही माझा बाप काढायचा नाही. आम्‍ही खालच्‍या स्‍तरावर बोलू शकत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla yashomati thakur criticized navneet rana at tivasa rana said that the couple is making false allegations mma 73 ssb

First published on: 13-09-2023 at 09:59 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा