नागपूर : २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याची धुरा आली. फडणवीसकडे मुख्यमंत्रीपद आल्यामुळे नागपूरचा विकास वेगाने होईल आणि मुंबई-पुणेसारख्या शहरांच्या तुलनेत नागपूरकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी आशा पुन्हा एकदा नागपूरकरांमध्ये प्रज्वलित झाली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि या पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांची नागपूरमध्ये सुरूवात झाली. मेट्रो पासून आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी, राष्ट्रीय विधी विद्यापीठसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था नागपूरमध्ये सुरू झाल्या. पूर्वीच्या काळात आधी पुण्यात काही गोष्टी व्हायच्या आणि नंतर नागपूरमध्ये त्या यायच्या, मात्र आता आधी नागपूरचा क्रमांक लागतो, याचा आनंद आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रम व्यक्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले फडणवीस?

आयआयएम नागपूरच्या कॅम्पसमध्ये रविवारी दोन मेगावॉट सौरउर्जा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून आयआयएम नागपूर परिसर ‘नेट झिरो कॅम्पस’ होणार आहे. रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार, आयआयएम नागपूरच्या बोर्ड ऑफ गवर्नरचे संचालक सी.पी.गुरनानी, आयआयएमचे संचालक डॉ.भीमराया मैत्री यांच्यासह राज्यमंत्री आशीष जैस्वाल, आमदार आशीष देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की आयआयएम, नागपूर हा कॅम्पस नेट झिरो कडे वळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जा बदलासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे आणि आयआयएम सारख्या संस्थांची यात महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. आयआयमच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. नेट झिरो कॅम्पस ची संकल्पनाही एक विशेष बाब आहे. याकरिता संस्थेचे कौतुक आहे. लवकरच पुण्यातही आयआयएम सुरू होणार आहे. लवकरच त्याच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रित केले जाईल. मात्र मला जास्त आनंद आहे, की अनेक वर्ष गोष्टी आधी पुण्यात सुरू व्हायच्या आणि नंतर नागपूरमध्ये यायच्या. आता पहिल्यांदा काहीतरी नागपूर मध्ये झाले आणि नंतर पुण्याकडे जात आहे.

आंतरराष्ट्रीय बनण्यासाठी गोल्फ टर्फ आवश्यक

आयआयएम नागपूरच्या परिसरात फडणवीस यांच्या हस्ते गोल्फ अकॅडमीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय शहर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. आंतरराष्ट्रीय बनण्याकरिता गोल्फ अकॅडमी टर्फची सुविधा आवश्यक असते. आयआयएम नागपूरमध्ये ही सुविधा उपलब्ध होत असल्याने नागपूरचा आंतरराष्ट्रीय बनण्याच्या मार्गावर आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur development is expected to accelerate as fadnavis takes over as chief minister tpd 96 amy