नागपूर : भाजपाला जातनिहाय गणना करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे. ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपाचा हा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे. पण, दोन्ही समाजातील जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले होते. ते त्यांना पाळता आले नाही. मात्र, आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवू आणि कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हेही वाचा – आंदोलकांवरील लाठीहल्ला शासनाचा नाकर्तेपणा; प्रदेश काँग्रेस सचिव जयश्री शेळकेंनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

‘भारत जोडो’ पदयात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात लोकसंवाद यात्रा काढण्यात आली. त्यापूर्वी पटोले यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जालन्यातील घटना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. भाजपची २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आली, पण आरक्षण काही दिले नाही. उलट त्यांनी तत्कालीन महाधिवक्ता कुंभकोणी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशाप्रकारचा युक्तिवाद करण्याची सूचना केली. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन २०१४ मध्ये खड्डे खोदले. आता ते त्याच खड्ड्यात पुरले जाणार आहेत.

हेही वाचा – दारूची नशा; सातबाऱ्यावर स्वाक्षरी करताना मद्यधुंद तलाठी कोसळला, व्हायरल व्हिडीओने खळबळ

वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजपा त्याविरोधात आहे. आम्ही सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करू, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकू आणि कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole spoke on maratha and obc reservation in nagpur nana patole criticized bjp rbt 74 ssb