गोंदिया :- जिल्ह्यातील नागझिरा – नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातून येथे सोडण्यात आलेली टी १ वाघिणी ने नागझिरात सोडल्यानंतर आपले अधिवास क्षेत्राची निवड करताना भटकंती करत मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हातील किरणापुरच्या जंगलात गेल्या एक महिन्यापासून आपले बस्तान बसविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील नागझिरा येथील वाघीण गेल्या एक महिन्यांपासून गोंदिया जिल्हा शेजारील मध्यप्रदेशच्या बालाघाटच्या जंगलात फिरत आहे. किरणापूर वन परिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीचे स्थान मिळाल्यानंतर २० जुलै रोजी दुपारी किरणापूर येथील पवार भवन जवळील टीव्हीएस एजन्सीच्या मागे असलेल्या शेतात शेतकर्‍यांना या वाघिणीचे पायाचे ठसे उमटलेले दिसले. त्यावर शेतमालक सेवकराम पटले यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन या बाबतची माहिती दिली. २० मे रोजी नवेगाव-नागझिरा अभयारण्य वनपरिक्षेत्रात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात आले.

हेही वाचा >>>अमरावती: चिखलदऱ्यासाठी शनिवार, रविवारी एकमार्गी वाहतूक; जाण्यास धामणगाव- मोथा, तर येण्यासाठी घटांग मार्ग

त्यापैकी एक वाघीण गोरेगाव वनपरिक्षेत्रात फिरत होती. यानंतर गोंदिया तालुक्यातील पांगळी जंगलातून छिपिया पासून काही अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील कडकाना जंगलात वाघिणीचे दर्शन झाले.तेव्हापासून ही वाघिणी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातच फिरत आहे.वन विभागाची १५ ते २० सदस्यांचे ४ पथक या वाघिणीच्या मागावर असून तिचा शोध घेत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनपरिक्षेत्राचे पथक कॉलर आयडीद्वारे वाघिणीचा शोध आणि शोध घेण्यासाठी वेगवेगळे गट तयार करून वाघिणीचे ठिकाण शोधत आहेत.

हेही वाचा >>>चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार

जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर आलेल्या या वाघिणीचे वय सुमारे ५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.किरणापूर वनपरिक्षेत्रातील सीतापार गावात वाघिणीने एका गुराची शिकार केली. वाघिण गुरांची शिकार केल्यानंतर रक्त पितात आणि नंतर त्यांचे अन्न सुरक्षित ठिकाणी लपवतात आणि पुन्हा परत जातात आणि ती केलेली शिकार खातात.

वाघिण हिंसक झाली नाही

किरणापूर वनपरिक्षेत्र अधिकारी जगतदास खरे यांनी सांगितले की, तिला पकडले जाऊ शकते, परंतु अद्याप ती हिंसक झालेली नाही. तिला या जंगलात खायला शिकार मिळत आहे, एकदा खायला मिळालं की ती आठ-दहा दिवस न खाता ही राहू शकते. महाराष्ट्र राज्याच्या वनपरिक्षेत्रातील पथके लोकेशनद्वारे सातत्याने निरीक्षण करत आहेत. सुदैवाने किरणापूर वनपरिक्षेत्रात या वाघिणीने अद्याप पर्यंत कोणताही उपद्रव किंवा तांडव न करता ती जवळील हट्टा वनपरिक्षेत्रात सध्या आहे. यावर वनविभागाकडून सखोल व सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T1 tigress left in nagzira settled in kiranpur forest in madhya pradesh gondiya sar 75 amy