नागपूर : पत्नीचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय असल्यामुळे युवकाने पत्नीचा चाकूने गळा चिरला. मुलगा वाचविण्यासाठी धावला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला केला आणि स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंकी नांदूरकर (३२, बगडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे तर रवी नांदूरकर असे आरोपी युवकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदनवन परिसरात रवीचा वाहनांना कुशन लावण्याचा व्यवसाय आहे. पत्नी पिंकी आणि दोन मुलांसह तो राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. त्यामुळे तो कट रचत होता. त्याने गांधीबागमधून गेल्या आठ दिवसांपूर्वी चाकू विकत घेतला. त्याला पत्नी व मुलांना संपवायचे होते. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करायची होती. रविवारी रात्री पत्नी व मुलांसह त्याने जेवण केले आणि सर्व जण झोपी गेले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रवी झोपेतून उठला. त्याने उशीखाली लपवून ठेवलेला चाकू काढला आणि पत्नीच्या गळ्यावरुन फिरवला. या हल्ल्यामुळे पत्नी मोठ्याने ओरडली. तर बाजूला झोपलेले ११ आणि १३ वर्षांची दोन्ही मुले झोपेतून उठली. त्यानंतर रवीने मोठ्या मुलावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने वार चुकवला. चाकू मुलाच्या बोटाला लागल्याने त्याची दोन बोटे कापल्या गेली.

लहान मुलाने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना आवाज दिला.शेजारी धावतच घरात आले. त्यावेळी पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर मोठा मुलगाही जखमी अवस्थेत होता. दरम्यान, रवीने स्वत:चाही गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन लावला आणि रवीला पकडून ठेवले. पोलिसांनी लगेच जखमी पिंकी, रवी आणि मुलाला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पिंकी यांची प्रकृती चिंताजनक होती. पिंकीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पत्नी आपल्याला दगा देत असल्याची भावना मनात होती. त्यामुळे पत्नी व मुलांना संपवून टाकल्यानंतर स्वत:ही आत्महत्या करणार होतो. मी पत्नी व मुलांचा खून करणार होतो. झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरला आणि एका मुलावरही हल्ला केला. मात्र, ते दोघेही थोडक्यात वाचले, अशी धक्कादायक माहिती एका युवकाने पोलिसांना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man slit his wifes throat with knife suspecting his wife having immoral relationship with neighbour adk 83 sud 02