जळगाव : जिल्ह्यात उत्पादित केळीचे दर रमजान महिन्याच्या प्रारंभी २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल होते. परंतु, होळीसह धुलिवंदन सणासाठी मजूर गावी गेल्याने आणि त्यातच ग्राहकांकडून मागणीही कमी झाल्याने केळीचे दर ५०० ते ६०० रुपयांनी घसरले. त्याचा मोठा फटका केळी उत्पादकांना बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थंडीच्या दिवसात केळीला फार उठाव नसतो. शिवाय बाजारात पेरू, सीताफळ, बोरे, मोसंबी, संत्री यासारख्या फळांची आवक वाढते. उत्तर भारतात हिवाळ्यात थंडीचे प्रमाण तुलनेत थोडे जास्तच राहत असल्याने केळीला दिल्लीसह पंजाब, उत्तर प्रदेशातून असलेली मागणी बऱ्याच प्रमाणात कमी होते. अपेक्षित मागणी न राहिल्याने केळीचे दर त्यामुळे खालावतात. यंदाही केळीचे दर जवळपास १००० रुपयांनी कमी झाले होते.

मात्र, संक्रांतीनंतर वातावरणातील गारठा कमी झाल्यावर केळीचे दर २५०० रुपयांवर गेले. थंडीच्या दिवसात कमी दरामुळे आर्थिक नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला होता. पुढील काळात मागणीत आणखी वाढ होऊन केळीचे दर आणखी वधारण्याची शक्यता जाणकारांनीही व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त राहिल्याने रमजान महिन्याची सुरूवात होईपर्यंत केळीचे दर २००० ते २१०० रुपयांपर्यंत खाली आले. तरीही केळी उत्पादक समाधानी होते.

मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केळीचे दर आवक वाढल्यानंतरही बऱ्यापैकी टिकून राहिले. मात्र, होळी आणि धुलिवंदन सणामुळे केळीचे दर घसरले. मजूर वर्ग सणांसाठी आपापल्या गावी गेल्याने केळी काढणीची प्रक्रिया मंदावली. त्यात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने काढणी झालेली केळी बाजारपेठेपर्यंत वेळेवर पोहोचणे दुरापास्त झाले. त्यातही जेवढी काही केळी बाजारपेठेत पोहोचली, तिला अपेक्षित ग्राहक मिळू शकले नाहीत. परिणामी, केळीचे दर १४०० ते १६०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले. दरात लवकर सुधारणा होण्याची शक्यता नसल्याने, संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

आवक वाढल्यानंतरही रमजानमुळे बाजारात केळीचे दर बऱ्यापैकी टिकून होते. मात्र, होळीसह धुलिवंदन सणाच्या प्रभावामुळे केळीचे दर आता क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. एकदा कमी झालेले दर व्यापारी लगेच वाढवत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. -गोकुळ पाटील (केळी उत्पादक, चांगदेव, जळगाव)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bananas price drops by rs 500 due to holi and dhulivandana festivals mrj