उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदार शिंदे गटात

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना आमदारांची संख्या विधान परिषदेच्या एकासह सात आहे.

गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आहेत. हॉटेलच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नाशिक : शिवसेनेत बंड करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेचे एका मंत्र्यासह पाच जण गेलेले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविषयीही संभ्रम आहे. आमदार शिंदेंच्या गटात गेले असले तरी जिल्हाप्रमुखांसह इतर प्रमुख पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याने उत्तर महाराष्ट्रात या बंडाचा मोठा परिणाम शिवसेनेवर परिणाम होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना आमदारांची संख्या विधान परिषदेच्या एकासह सात आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पारोळय़ाचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोर पाटील, चोपडय़ाच्या लता सोनवणे हे शिदे यांच्या बंडात सामील असल्याचे सांगितले जात आहे. यात गुलाबराव हे शिंदे यांच्याकडे गेल्याने अधिक आश्चर्यकारक मानले जात आहे. जळगावातील मुक्ताईनगरचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. तेही शिंदे यांच्याबरोबर असल्याची चर्चा होती. परंतु, त्यांच्या पत्नीने ते मुंबईत असल्याची माहिती दिली.

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दोनच आमदारअसून, नांदगावचे सुहास कांदे हे शिंदे यांच्या बरोबर आहेत. कृषिमंत्री दादा भुसे हे सध्या तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आहेत. नाशिक शहरातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. संजय राऊत यांच्याशी जवळीक असणारे अनेक पदाधिकारी नाशिकमध्ये आहेत. धुळे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. जिल्हाप्रमुखासह इतर पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांविरोधात आंदोलन करुन उध्दव ठाकरेंसोबत असल्याचे म्हटले आहे. नंदुरबार जिल्ह्यात नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमश्या पाडवी हे एकमेव आमदार आहेत. ते मुंबईतच आहेत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five mlas from north maharashtra in eknath shinde group zws

Next Story
पहिल्याच पावसाने स्मार्टपणा फोल; सराफ बाजार, दहीपूल परिसर पाण्याखाली; दुकानांमध्ये पाणी; वाहनांचे नुकसान, आठवडे बाजाराची दाणादाण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी