नाशिक : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पाच वर्षापूर्वी सुमारे ४६ लाख रुपये असणारे वार्षिक उत्पन्न २०२४-२५ या आर्थिक वर्षात दोन कोटी १९ लाखहून अधिकवर गेले आहे. पत्नी साधना महाजन यांच्या वार्षिक उत्पन्नातही साधारणत: याच गतीने वाढ झाली असून सुवर्णनगरी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असणाऱ्या महाजन दाम्पत्याकडे जवळपास पावणेतीन किलो सोने तर, चार किलो चांदी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जामनेर मतदारसंघात उमेदवारी करणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन कुटूंबियांची एकूण संपत्ती जवळपास ४० कोटींच्या घरात आहे. त्यांच्यावर दीड कोटींचे कर्ज आहे. पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत तब्बल १५ कोटींची वाढ झाली आहे. वाणिज्य शाखेत तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलेल्या महाजन यांनी आजवर अनेक महत्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत. महाजन दाम्पत्याने स्वत: खरेदी केलेल्या मालमत्तेचे आजचे मूल्य २० कोटींहून अधिक असून वारसाहक्काने प्राप्त झालेल्या मालमत्तेचे मूल्य सुमारे १३ कोटी इतके आहे. या दाम्पत्याकडे दोन कोटीहून अधिकचे सोने आणि चार लाख रुपयांची चांदी आहे. महाजन यांच्याकडे शस्त्र परवाना असून काही वर्षांपूर्वी कमरेला बंदूक लावून त्यांनी भाषण केले होते. महाजन यांच्याविरुद्ध जामनेर आणि निंभारा, पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा…दादा भुसे यांच्या विरोधातील उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ठाकरे गटाची तक्रार

यातील एक गुन्हा शैक्षणिक संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी विश्वस्तांना दमदाटी, धमकावणे, मारहाण करून डांबून ठेवणे, खंडणी आदी तक्रारींचा आहे. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध कोणतेही दोषारोपपत्र दाखल करू नये आणि कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हा गुन्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला आहे.

एकूण मालमत्ता – ३९ कोटी ७५ लाख

२०१९ मधील मालमत्ता – २५ कोटी ५२ लाख

सध्याची जंगम (चल) मालमत्ता – सहा कोटी ७३ लाख

स्थावर (अचल) मालमत्ता – ३२ कोटी ९२ लाख

गुन्हे – जामनेर, निंभोरा आणि पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग झालेले असे विविध कलमांन्वये तीन गुन्हे दाखल आहेत.

शिक्षण – वाणिज्य शाखा तृतीय वर्ष

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik bjp minister girish mahajans annual income rise from 46 lakh to 2 crore sud 02