बेलापूर, नेरुळ, घणसोलीत गुडघाभर पाणी; नालेसफाईचा दावा फोल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई नवी मुंबई रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईचाही काही भाग पाण्यात गेला होता. पालिकेने शंभर टक्के नालेसफाईचा दावा करूनही बेलापूर, नेरुळ, घणसोली, कोपरखैरणे, वाशी येथील सखल भागांत गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गावर सकाळी तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.

३० जून रोजी २४२ तर १ जुलै रोजी ७८.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  दुपारी बारानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू पाण्याचा निचरा झाल्याने वाहतुकीसह जनजीवन पूर्वपदावर आले.

शहरात रविवारी रात्री बारा वाजल्यापासूनच पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. यामुळे बेलापूर विभागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सीबीडी सेक्टर २०, बेलापूर, वाशी , घणसोली येथील सखल भागात चार ते पाच फूट पाणी साचले होते.

शीव-पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी सर्कल या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले होते. रस्त्याचे दुभाजक पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. चारचाकी गाडीचे छत शिल्लक दिसत होते. यामुळे सकाळपासून एकाच मार्गिकेतून वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे दुपापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पालिका प्रशासन शहरात शंभर टक्के नालेसफाई गेल्याचा दावा करीत आहे, मात्र  पाणी साचल्याने नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

कागदावर दाखवण्यासाठी वरचेवर नालेसफाई करीत असतात, असे अरोप नागरिक करीत आहेत.

महिन्याभरात ७४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना 

गेल्या महिन्याभरापासून नवी मुंबई शहरातील प्रभागांमध्ये १ जून ते आत्तापर्यंत ७४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रविवारी आठ ठिकाणी, सोमवारी सात ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वाशी व नेरुळ विभागात दोन ठिकाणी, बेलापूर, ऐरोली, घणसोलीमध्ये एके ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडलेली आहे.  आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामध्ये ११ जणांचे एक पथक असून १ अधिकारी व १० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ४ अग्निशमन दलात आपत्कालीन यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये १ नियंत्रण अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या विभागातील कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कार्यरत असतात, अशी माहिती आपत्कालीन विभागाने दिलेली आहे.

कोकण भवन पाण्यात

बेलापूर येथील ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असणारे कोकण भवनचा तळमजला पाण्यात बुडाला होता. सकाळी ६ ते साडेआठ दरम्यानच्या कालावधीत येथे तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते.  या तळमजल्यावर जातपडताळणी कार्यालय, सरकारी दवाखाना, चौरस आहार उपाहारगृह, पोस्ट ऑफिस, कोषागार ही  कार्यालये आहेत. या कार्यालयात पाणी गेले होते. त्यामुळे तळमजला पाण्याखाली असल्याने विद्युतपुरवठा बंद करण्यात आला होता.

सरासरी गाठली? जून महिना कोरडा

गेल्यानंतर चिंता निर्माण झाली होती. मात्र पावसाने शेवटच्या चार दिवसात दमदार हजेरी लावत पावसाची जूनची सरासरी गाठत आणली आहे. गेल्या वर्षी शहरात ८५१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यावर्षी आतापर्यंत ८१७  मिलीमीटर पाऊस झाला आहे.गेल्या वर्षी मोरबे धरण परिसरात एक हजार मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी आतापर्यंत यक्त ६५४ मिमी पाऊस झाला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai rains heavy rainfall in navi mumbai zws