अंजली सुमतीलाल देसाई
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग १८५१ मध्ये कंपनी सरकारच्या राजवटीत स्थापन झाला. त्या काळात भारतात भूविज्ञान शिकवण्याची सोय नव्हती. त्यामुळे या विभागात बराच काळ फक्त युरोपीय आणि खास करून इंग्रज भूवैज्ञानिकच असत. या संस्थेच्या प्रमुख पदावरही युरोपीय व्यक्तीच असत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९५१ पर्यंत सर्वेक्षण विभागाच्या महानिदेशकपदी डॉ. विल्यम वेस्ट होते. हे पद भूषवणारे पहिले भारतीय भूवैज्ञानिक म्हणजे डॉ. महाराजापुरम सीतारामन कृष्णन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १८९८ रोजी तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात, त्यांच्या महाराजापुरम या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण तंजावरला झाले. चेन्नईच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी भूविज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. त्या काळात मानाची समजली जाणारी रॉयल कॉलेज ऑफ लंडनची शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. १९२४ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त केली. त्यासाठी त्यांनी काठेवाडमधल्या गिरनार पर्वत आणि ओशाम टेकड्या इथल्या खडकांवर संशोधन केले होते.

हेही वाचा : कुतूहल : भूविज्ञान कशासाठी?

त्याच वर्षी कृष्णन यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात निवड झाली आणि डिसेंबर १९२४ मध्ये ते कामावर रुजू झाले. सर्वेक्षण विभागात कार्यरत असतानाच १९३५-३६ दरम्यान इंग्लंड, अमेरिकन संघराज्य आणि ऑस्ट्रिया या देशांना त्यांनी भेटी दिल्या. खनिज तेलाच्या अन्वेषणासाठी (एक्स्प्लोरेशन) उपयोगी पडणाऱ्या भूभौतिकी या विषयाचा आणि खनिजविज्ञानातील नव्या तंत्रज्ञानाचा त्यांनी तिथे अभ्यास केला. भूविज्ञानाचे सखोल ज्ञान आणि उच्च कोटीची कार्यक्षमता यामुळे कृष्णन यांच्यावर विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. १९४८ मध्ये खाणकाम उद्याोगावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागपूरला ‘भारतीय खनिकर्म कार्यालय’ (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स) सुरू केले. कृष्णन त्या कार्यालयाचे पहिले निदेशक होते. सव्वादोन वर्षे त्यांनी हे पद सांभाळले आणि या विभागाची घडी व्यवस्थित बसवून दिली.

१९५१ मध्ये त्यांच्या मातृसंस्थेत, म्हणजे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात, महानिदेशक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५६ मध्ये ते निवृत्त झाले. त्या सुमाराला धनबादचे भारतीय खनिकर्म विद्यालय (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) येथे सुधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. तो व्यवस्थित सुरू व्हावा यासाठी तिथे संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा : कुतूहल : भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा प्रारंभ

भारतीय प्रस्तरविज्ञानात (इंडियन स्ट्रॅटिग्राफी) झालेले अद्यायावत संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे, यासाठी त्यांनी १९४३ मध्ये अतिशय उत्कृष्ट पाठ्यपुस्तक लिहिले. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विद्यार्थ्यांमध्ये ते पाठ्यपुस्तक सुमारे ६० वर्षे लोकप्रिय होते.

अंजली सुमतीलाल देसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr maharajapuram sitaram krishnan first director of geological survey of india css