पालघर : यंदाच्या वर्षी मार्चपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने शरीरामधील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी शहाळय़ाला (नारळपाणी) मागणी आहे. सध्या उच्च दर्जाचे शहाळे प्रति नग ४५ ते ६० रुपये दराने विकले जात असले तरी पालघर जिल्ह्यातील बागायतदारांना जेमतेम २२ ते २८ रुपये प्रति नग दरावर समाधानी राहावे लागत आहे. त्यामुळे बाजारांमधील तेजीचा स्थानिक उत्पादकांना विशेष लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये सुमारे १,६०० हेक्टर क्षेत्रफळावर नारळ लागवड असून, दरवर्षी प्रति हेक्टरी १० हजार नारळांचे उत्पादन मिळते. या भागातील शहाळे मुंबई, मुंबई उपनगर तसेच मीरा-भाईंदर, वसई विरार शहरात मोठय़ा प्रमाणात विकले जाते. पालघरमधील शहाळी व नारळांना दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या शहाळी व नारळांकडून स्पर्धा होते. जिल्ह्यातील शहाळय़ात २५० ते ३०० मिलीलिटर पाणी असून, त्याला विशिष्ट गोडी आहे. तसेच नारळातील कोवळा गर अथवा मलईला मुंबईकरांमध्ये मागणी आहे.

जिल्ह्यातील अधिक तर भागात सर्वोत्तम दर्जाच्या शहाळय़ाची २२ ते २८ रुपये प्रति नग, त्या खालोखालच्या दर्जाच्या (क्रमांक २) १२ ते १४ रुपये, तर अगदी लहान कुल्फी दर्जाची पाच ते सात रुपये दराने खरेदी केली जाते. मात्र, मुंबई व उपनगरातील बाजारपेठेत सर्वोत्तम दर्जाचे शहाळे ४५ ते ६० रुपये, तर मध्यम दर्जाचे ३५ ते ४० रुपये, तर अगदी लहान शहाळे १५ ते २० रुपयांनी विकले जात आहे. संकेतस्थळावरून अथवा विविध ऑनलाइन मार्केटिंग प्रणालीवर शहाळय़ाचा दर ४० ते ५५ रुपये प्रति नग इतका आहे.

नारळाच्या प्रत्येक झाडाला दर तीन महिन्याला सरासरी १० ते १६ नग नारळ लागतात. झाडावरून हे नारळ काढण्यासाठी प्रति झाड ४० रुपये इतकी मजुरी घेण्यात येते. वाहतुकसाठी सरासरी दोन रुपये प्रति नग इतका खर्च येतो. असे असले तरीही उच्च प्रतीच्या पालघरमधील नारळ उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून उपेक्षा होत आहे.

उन्हाळय़ात नारळाचे उत्पादन कमी होत असून, याच हंगामात विविध कारणांमुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवते. परिणामी झाडांवरून नारळ उतरवण्यात अडचणी येतात. त्यामुळे झाडावर फळ असले तरीही ते बाजारापर्यंत पोहोचवण्यास मर्यादा येतात. पावसाळय़ामध्ये नारळाचे उत्पादन वाढत असले तरी बाजारभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात विशेष वाढ होत नाही.

थेट विक्रीची व्यवस्था नाही

बागायतदार अथवा बागायतदारांच्या सहकारी संस्था नारळ एकत्र करून त्याची विक्री करत असले तरीही हा सर्व व्यवहार व्यापाऱ्यांमार्फत होतो. पूर्वी काही संस्थांचे मुंबई येथे स्वत:चे विक्री केंद्र (गाळे) होते. मात्र कालांतराने तशी विक्री करणे त्रासदायक ठरत असल्याने जिल्ह्यातील नारळ व्यवसाय व्यापाऱ्यांच्या हाती गेला. रेल्वे स्थानक अथवा शहरातील इतर संस्थांमार्फत येथील सहकारी संस्थांना थेट विक्रीसाठी दालन (जागा) उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

नारळपाण्याची विविध उत्पादने

नारळपाणी हे पौष्टिक ऊर्जा पेय असून त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरासाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त असते. २५० मिलीलिटर नारळ पाण्यात ४० ते ५० कॅलरी ऊर्जा मिळते. सध्या नारळ पाण्याची पाऊच, टेट्रापॅक व प्लास्टिकच्या बाटल्यांमधून विक्री केली जाते.

नारळाची विक्री अनेक ठिकाणी खासगी अथवा सहकारी तत्त्वावर केली जाते. येथील नारळ उत्पादन उच्च दर्जाचे असले तरीही व्यापारी बागायतदारांना बाजारभावाच्या निम्माच दर  देतात. येथील नारळ उत्पादकांना वा सहकारी संस्थांना थेट विक्रीसाठी सुविधा शासनाने करून द्यावी.

मिलिंद म्हात्रे, माजी सभापती, माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut demand in palghar city coconut production in palghar zws